Thursday, March 27, 2025
Homeबातम्याकस्तुरबांचे मोठेपण जगाला समजले नाही - नवागुंद

कस्तुरबांचे मोठेपण जगाला समजले नाही – नवागुंद

कोल्हापूर – महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याच्या बरोबरीने धावताना स्वतःची फरफट न होऊ देता स्वत्व टिकविण्यामध्ये कस्तुरबा गांधी यांचे मोठेपण आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सोनाली नवांगूळ यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत ‘कस्तुरबा उमजून येताना’ या विषयावर 5 मार्च 25 रोजी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दशरथ पारेकर होते. डॉ. प्रकाश पवार प्रमुख उपस्थित होते.सोनाली नवांगूळ यांनी तुषार गांधी यांचे ‘दि लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर: माय बा’ हे पुस्तक अनुवादित केले आहे. या अनुवादाच्या निमित्ताने नव्याने उमगलेल्या कस्तुरबा गांधी यांच्याविषयी अत्यंत आपुलकीच्या भावनेतून मांडणी केली. त्याचप्रमाणे राष्ट्रपित्याच्या छायेखाली जगाने झाकोळून टाकलेल्या त्यांच्या स्वयंपूर्ण व्यक्तीमत्त्वावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. कस्तुरबा गांधी यांना लिहीता येत होते, याची साधी नोंदही जगाने दोन वर्षापूर्वीपर्यंत घेतली नाही, याची खंत व्यक्त करीत कस्तुरबांनी त्यांच्या डायरीमध्ये केलेल्या नोंदींची वैशिष्ट्ये आणि त्यामधून उलगडलेल्या कस्तुरबांविषयी सोनाली नवांगूळ यांनी माहिती दिली.

नवांगूळ म्हणाल्या, कस्तुरबा या महात्मा गांधी यांच्या अनुयायी नव्हत्या, तर सखी होत्या. त्यामुळे त्यांच्या जीवनातील आपले स्थान अधोरेखित कसे करावयाचे, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्या मूलतः संसारी, हौशी आणि आसक्त असल्या आणि महात्मा गांधींचे सातत्याने स्थान बदलणे, त्यांची प्रयोगशीलता, त्यांच्या चळवळी यांच्याशी जुळवून घेताना दमछाक होत असली तरी त्यांनी हे सातत्यपूर्ण बदल रिचवले, स्वीकारले. पतीच्या प्रत्येक चळवळीत सातत्याने साथ देणे, हे त्यांचे मोठेच कार्य होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांचे आकलन वाढविण्यामधील त्यांचे योगदानही आपण लक्षात घ्यायला हवे. त्या केवळ महात्म्याची सावली नव्हत्या, तर त्यांच्या स्वतःच्या काही अंगभूत क्षमता होत्या. त्या क्षमतांनिशी त्या महात्म्याच्या बरोबरीने उभ्या राहिल्या, हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या प्रत्येक महिलेला कस्तुरबांच्या संघर्षाशी आपले नाते जोडता येते. त्याचप्रमाणे सूर्याच्या प्रखर प्रकाशातही छोट्या काजव्याप्रमाणे आपला प्रकाश हरवू न देण्याची शिकवणही कस्तुरबांच्या जीवनाकडून आपल्याला मिळते.अध्यक्षीय मनोगतात डॉ. पारेकर म्हणाले, महात्मा गांधींविषयी अनेकांनी लेखन, आकलन करवून घेण्याचा मोह जगभरातील विचारवंतांना आवरत नाही. मात्र, याच विचारवंतांकडून कस्तुरबांवर मात्र कळत नकळतपणे अन्याय झालेला आहे. उशीराने का होईना, त्यांना आता ते समजून घेऊ लागले आहेत, त्यांच्याविषयी लिहू लागले आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. गृहिणी ते गांधींच्या सत्याग्रहात सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला सत्याग्रही, ही कस्तुरबांची वाटचाल विलक्षण आहे. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रयोग केले असले तरी त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाला संमती देणे, यामधील कस्तुरबांचे मोठेपणही आपण लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे स्वात व प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुरेश शिपूरकर, डॉ. रविंद्र भणगे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. जयश्री कांबळे यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments