Monday, October 7, 2024
Homeलेखपर्यटकांची काळजी घेणारा देश : जर्मनी

पर्यटकांची काळजी घेणारा देश : जर्मनी

अर्थतज्ञ , पत्रकार यमाजी मालकर सध्या जर्मनी व स्वित्झर्लंड देशाच्या भेटीस गेले आहेत. तेथे जाणा-यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत त्यांनी फेसबुकवर विचार मांडले आहेत, ते त्यांच्या फेसबुक भिंतीवरुन साभार घेतले आहेत. या प्रवासवर्णन मालिकेतील हा शेवटचा लेख आहे.

कन्या आणि जावयाच्या भेटीसाठी जर्मनीमध्ये आलेलो. आम्ही यावेळी त्यांच्यासह आणि त्यांच्या शिवाय बरेच फिरलो. एवढया कमी दिवसात तो देश आणि समाज तर आपल्याला कळू शकत नाही, मात्र तेथील काही पद्धती लक्षात येतात. हे देश सार्वजनिक जीवनात ‘सिस्‍टीम्स ‘ लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यातून त्यांनी आपले जीवन सुसह्य करून घेतले आहे. मे, जून हा तर येथील उन्हाळा, पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी पडते तेव्हा येथील जीवन अधिक खडतर असते. त्याचे जे वर्णन ऐकायला मिळाले, त्यावरून साधारण कल्पना येते.

.. तर ‘इझ ऑफ लिव्हिंग’ अशा 10 गोष्टी मला दिसल्या, त्या मी येथे देतो आहे. सतत परदेशात प्रवास करणाऱ्यासाठी त्या अगदी प्राथमिक असू शकतात, पण जे कधीतरी असा प्रवास करतात, त्याच्यासाठी त्या नवीन आहे.

1. जर्मनीत पोस्टाचे महत्व त्यांनी अबाधित ठेवले आहे, त्यामुळे पोस्टाला येथे विशेष महत्व आहे. घरात प्रवेश करताना ते कुतूहलाने पत्रपेटी उघडताना दिसतात. आपल्याकडे प्रिंटिंगचे महत्व कमी होते आहे, पण येथे जर्मन भाषेतील पुस्तके आणि मासिकाची भव्य दालने पाहायला मिळाली. जर्मन नागरिकांनी आपल्या जीवनाची गती विनाकारण वाढविलेली नाही, असे वाटते.

2. जर्मनीत अतिशय उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. ट्राम, मेट्रो, बस, स्कुटर, आणि रेल्वे याचे जाळेच सर्व शहरात पाहायला मिळते. त्यावर विसंबून तुम्ही फिरू शकता. जर्मन रेल्वे चांगलीच आहे, मात्र दक्षिण जर्मनीत आलेल्या पुरामुळे ती चांगलीच विस्कळीत झालेली आम्ही अनुभवली.

3. रिजनल रेल्वेचा महिनाभराचा 49 युरोचा पास आम्ही घेतला, ज्यात रिजनल रेल्वे, ट्राम, मेट्रो आणि बसने महिनाभर तुम्ही कोठेही प्रवास करू शकता. त्यामुळे कोठेही तिकीट काढत बसण्याची गरज नाही. आणि तिकीट काढायचेच झाले तर अनेक ठिकाणी तिकीट मशीन आहेतच. हे तिकीट ICE म्हणजे फास्ट ट्रेन्स साठी चालत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.

4. तुम्ही बाहेरगावी सामान घेऊन गेलात, पण तुम्हाला हॉटेल लवकर सोडून पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही स्टेशनवर बॅगा ठेवू शकता, त्यासाठी मोठया स्टेशनावर अनेक कपाटांची सोय केलेली आहे, जेथे सर्व व्यवहार तांत्रिक रित्या होतो. (आपल्याकडे ही व्यवस्था माणसांच्या हाती आहे)

5. प्रवासातील आणखी एक सोय म्हणजे रेल्वेने तुम्ही ज्या गावी उतरणार आहात, तेथून पुढे जाण्यासाठी बस, रेल्वेची कशी कनेक्शन आहेत, याची माहिती ते स्टेशन येतानाच डिस्प्ले केली जाते. (पुण्यातील पीएमटी वेळापत्रकाबाबत असे काही करण्याचे काम गुगल करते आहे, पण ते गेली काही वर्षे पूर्ण होत नाहीये. अर्थात ते पूर्ण होणे अवघडच आहे, कारण मिनिटामिनिटांचे वेळापत्रक बनविणे, ही आपल्या दृष्टीने पुढील टप्पा आहे)

6. स्वच्छतागृहाचा वापर हा एक येथे मोठा विषय आहे, कारण बहुतेक ठिकाणी त्यासाठी तुम्हाला एक दोन युरो (रुपयात अजिबात मोजू नका) मोजावे लागतात. अर्थातच ती अतिशय स्वच्छ असतात. हा आपल्याकडेही मोठा विषय आहे, पण त्यासाठी हे मॉडेल समोर ठेवता येईल, असे वाटत नाही. जेथे पर्चेसिंग पॉवर अधिक आहे, तेथे मात्र ही सेवा विकतची केली पाहिजे, तरच स्वच्छता राहू शकेल. मूळात आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेला सर्वत्र महत्व द्यावे लागेल.

7. रस्त्यावरील खड्डे हा येथेही कधीकाळी मोठा विषय असावा, त्यामुळेच त्यांनी हा शोध लावला. रस्त्यात साईन बोर्ड लावताना किंवा मंडप आदी उभे करताना त्यांनी वजनदार ठोकळे तयार केले आहेत, बहुतांश साईन बोर्ड त्यावर ठेवलेले सर्वत्र दिसतात.

8. पोलिसांचा धाक असावा, पण भीती वाटण्याचे काही कारण नाही. त्यामुळे उत्सव, गॅदरिंग मध्ये पोलिसांचीही दालने पाहायला मिळाली, ज्यात पोलीस गाडीवर मुलांना बसवून पालक फोटो काढत होते.

9. वृद्धांचा एकटेपणा हा आता जागतिक विषय झाला आहे, युरोपमध्ये तो अधिकच आहे. जर्मनीमध्येही वृद्धांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक व्यवस्था केल्या आहेत, म्हातारी माणसे आपलीआपली सर्वत्र फिरताना दिसतात. येथे 40 टक्के इन्कमटॅक्स घेतला जात असल्याने सरकारच्या तिजोरीतून त्यावर मोठा खर्च करणे शक्य आहे.

10. पर्यटन ठिकाणी पर्यटकांची सोय व्हावी म्हणून खास काळजी घेतलेली दिसते, फ्रँकफर्ट पासून जवळच असलेल्या Rudesheim am Rhein येथे द्राक्ष शेतीत फिरताना पर्यटकांसाठी जागोजागी दिशादर्शक फलक लावलेले होते तर स्वित्झर्लंडमध्ये तर रेल्वेच्या सीट जवळच इंटरलाकेन या पर्यटन भागाचा चित्रमय नकाशा लावलेला होता.

आपण यातील अनेक गोष्टी घेऊ शकतो, असे वाटते. अर्थात, त्या सर्वांना आपले हवामान, लोकसंख्या, पर्चेसिंग पॉवर अशा अनेक मर्यादा आहेत, त्यामुळे त्यात आवश्यक ते बदल करून ती दिशा तर आपण निश्चितच पकडू शकतो.

जर्मनीत भरपूर भारतीय भेटतात, जे येथे अनेक वर्षे राहतात, ज्यातील अनेक जण तर जर्मन नागरिक झाले आहेत. आणि इतर अनेक देशांचे नागरिक असल्याने वेगवेगळ्या प्रकारची, वंशाची माणसे पाहायला मिळतात. उद्याचे जग जात, धर्म, वंशाच्या ऐवजी अशा काही चांगल्या ‘सिस्‍टीम्स ‘ ने बांधलेले असेल, असे म्हणता येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments