Saturday, December 21, 2024
Homeबातम्यासाहित्य चळवळ रुजली - जिल्हाधिकारी ओम्बासे

साहित्य चळवळ रुजली – जिल्हाधिकारी ओम्बासे

सावित्रीच्या कविता , सय , मातीचे जग कविता संग्रहांचे थाटात प्रकाशन

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात साहित्य चळवळ जोमाने वाढते आहे याचा मला आनंद वाटतो असे मत धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केले . सावित्रीच्या कविता ,  सय’ , मातीचे जग या तीन कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात  प्रमुख अतिथी म्हणून  ते बोलत होते .

सावित्रीच्या कविता या संग्रहात योगदाान दिलेल्या कवयित्रींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार.

 रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी सकाळी अकरा वाजता धाराशिव येथील स्वयंवर  मंगल कार्यालयात हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता . यावेळी कथाकार डॉ . भास्कर बडे प्रमुख वक्ते  म्हणून उपस्थित होते . अध्यक्षस्थानी साहित्यिका  कमल नलावडे  होत्या . मंचावर अक्षरवेलच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ .सुलभा देशमुख, ‘सावित्रीच्या कविता ‘  या कविता संग्रहाच्या संपादिका डॉ . रेखा अनिल ढगे आणि श्रीमती  कविता रमेशराव पुदाले, अपूर्वाई प्रकाशनाचे  डॉ . रविंद्र चिंचोलकर,  कवयित्री शिवनंदा माळी, ‘ज्ञानसूर्य प्रकाशनाच्या उमा काळे – माळी व मारुती माळी आदी मान्यवर उपस्थित होते .

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे स्वागत.

जिल्हाधिकारी डॉ .ओम्बासे  म्हणाले की, ‘सावित्रीच्या कविता ‘  या कविता संग्रहात 50 कवयित्रींनी सावित्रीबाई फुले यांच्या  जीवन कार्यावर लिहिलेल्या कविता समाविष्ट आहेत . तसेच या सोहळ्यात तीन कविता संग्रहांचे एकत्रित प्रकाशन झाले आहे, या समारंभास साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती आहे . धाराशिव जिल्हयात साहित्य चळवळ चांगली रुजली असल्याचे यातून जाणवते .आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला ताण-तणावांना सामोरे जावे लागते ,अशा वेळी साहित्याची आवड जोापासावी म्हणजे तणाव दूर होऊन आनंदी जीवन जगता येते.

प्रमुख वक्ते भास्कर बडे बोलताना .

प्रमुख वक्ते कथाकार डॉ.भास्कर बडे ‘सावित्रीच्या कविता ‘ या संग्रहावर भाष्य करताना म्हणाले “सावित्रीची कविता’ या संग्रहात पन्नास कवयित्रींनी योगदान दिले, हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच शक्य झाले .  रेखा ढगे आणि कविता पुदाले यांनी संपादित केलेला ‘सावित्रीच्या कविता ‘ हा संग्रह मराठी साहित्यातील एक दस्तावेज ठरेल . कविता लिहिणे सोपे नसते हे खरे, मात्र किती कविता लिहिल्या यापेक्षा दर्जेदार कविता किती आहेत त्याला अधिक महत्व असते असेही त्यांनी सांगितले .

सौ . शिवनंदा माळी यांच्या ‘सय’ कविता संग्रहाविषयी बोलताना प्राचार्या डॉ .सुलभा देशमुख म्हणाल्या “या संग्रहातील कविता आई , वडील आणि बहिणीच्या आठवणी सांगणाऱ्या आहेत . या कवितांमधून वेदनेचा हुंकार जाणवतो तसेच सकारात्मकतेची वाटही दिसते . कवयित्रीने ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण कवितांमधून मांडले आहे . “ .

सय कवितासंग्रहाचे प्रकााशन.

कै . अलकनंदा माळी यांच्या ‘ मातीचे जग’ या काव्य संग्रहाविषयी बोलताना डॉ .रविंद्र चिंचोलकर म्हणाले “ या संग्रहातील प्रत्येक कविता आशयघन आहे . या कवितांमधून ग्रामजीवनाचा गोडवा जाणवतो . शहरात मराठी भाषेचे धिंडवडे निघत असताना, ग्रामीण भागातील साहित्यिक मराठी भाषा जोपासण्याचे  कार्य करीत आहेत, त्याचे हे चांगले उदाहरण आहे . अशा संग्रहांना शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे . 

मातीचे जग कविता संग्रहाचे प्रकाशन

अध्यक्षीय भाषणात कमल नलावडे म्हणाल्या या सोहळयात प्रकाशित झालेने तीनही कविता संग्रह मुखपृष्ठ, आशय या सर्व दृष्टिने दर्जेदार आहेत . आम्ही धाराशिव येथे वीस वर्षापूर्वी लावलेले अक्षरवेल साहित्य मडळाने लावलेले साहित्य सेवेचे रोपटे बहरले आहे .

उपस्थित रसिक

प्रारंभी दीप प्रज्वलन झाले. बागल परिवारातील मुला -मुलींनी स्वागतगीत गायिले . मोक्षा करवर यांनी सावित्रीचे गीत सादर केले . अनिल ढगे, सौ.विमल नवाडे,बालाजी माळी, संस्कृती ढगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले . डॉ .रेखा ढगे आणि कविता पुदाले यांनी प्रास्ताविकात सांगितले की दोन वर्षापूर्वी घेतलेल्या काव्य स्पर्धेतून ‘ सावित्रीच्या कविता’ या संग्रहाची कल्पना सुचली व ती साकार झाली . सौ .शिवनंदा माळी यांनी प्रास्ताविकात त्यांच्या ‘सय’ आणि भगिनी कै अलकनंदा ढगे यांच्या ‘मातीचे जग ‘  या कविता संग्रहांची पार्श्वभूमी सांगितली . ‘सावित्रीच्या कविता’ हा संग्रह प्रकाशित करणारे अपूर्वाई प्रकाशन, पुणे चे डॉ . रविंद्र चिंचोलकर तसेच ज्ञानसूर्य प्रकाशनाच्या उमा काळे – माळी व मारूती माळी यांचा यावेळी सात्कार करण्यात आला .

‘सावित्रीच्या कविता ‘ या संग्रहात योगदान देणाऱ्या सर्व कवयित्रींचा सन्मानचिन्ह देऊन  सत्कार करण्यात आला . सुनीता गुंजाळ आणि संस्कृती ढगे यांनी सूत्रसंचालन केले .जयश्री फुटाणे यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रमास साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती होती . .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments