वेठबिगारी पुन्हा कर्मचा-यांच्या उंबरठयावर
बंगळुरु – कर्मचाऱ्यांनी दररोज 14 तास काम करावे असा प्रस्ताव कर्नाटकातील माहिती तंत्रज्ञान ( आय.टी ) क्षेत्रातील कंपन्यांनी राज्य सरकारकडे मांडला आहे . कर्मचारी संघटनांचा या प्रस्तावाला विरोध आहे . कर्नाटक सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे . जर आय. टी. क्षेत्रात हे सुरु झाले तर इतर क्षेत्रातही कामाचे तास वाढण्याचा धोका आहे.
इन्स्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती गतवर्षी मुलाखतीत म्हणाले होते की, मी आठवड्यात 80 ते 90 तास काम करायचो आय.टी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी दररोज 14 तास म्हणजे आठवड्यातून 70 तास काम करायला तयार व्हायला हवे .असे झाल्याने भारतात चांगली कार्यसंस्कृती निर्माण होऊ शकेल .नारायण मूर्ती यांच्या या विधानावर सर्व स्तरातून टीका झाली होती .त्यामुळे हा विषय मागे पडला असे वाटले होते . मात्र कर्नाटकातील आय . टी . कंपन्यांनी हा सल्ला गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे . त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी दररोज 14 तास काम करावे असा प्रस्ताव त्यांनी सरकारपुढे मांडला आहे .
दुसऱ्या महायुद्धा नंतर जापान आणि जर्मनीची आर्थिक दृष्ट्या खूप पीछेहाट झाली होती . ती दूर करण्यासाठी या देशातील कर्मचाऱ्यांनी दररोज 14 तास काम केले होते .भारतात चांगली कार्य संस्कृती आहे हे अभिमानाने सांगण्यासाठी भारतातील तरुणांनी देखील दररोज 14 तास काम करण्याची तयारी ठेवावी असे नारायण मूर्ती आणि त्यांच्या सारखा विचार करणाऱ्या उद्योजकांचे म्हणणे आहे .
कामाच्या तासांचा इतिहास
भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते तेव्हा भारतीय कामगारांकडून इंग्रज अधिकारी वेठबिगारांसारखे काम करून घेत असत . आठवड्यात एक दिवसही सुटी दिली जात नव्हती .मात्र कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी प्रदीर्घ लढा दिला .त्यामुळे इंग्रज सरकारला दररोजचे कामाचे तास आठ तास करणे व रविवारची हक्काची सुटी देणे भाग पडले . हीच पद्धत सुरु होती .
श्रमिक कायदा काय सांगतो ?
कंपनी कायदा 1948 नुसार कामाचे तास एका आठवड्यात 48 पेक्षा अधिक असू नयेत .मात्र भारतात आय .टी .सेक्टर ची वाढ झाल्यानंतर पाच दिवसाच्या आठवडयाचा प्रस्ताव पुढे आला . कर्मचाऱ्यांनी दररोज दोन तास अधिक काम करावे ( 8+2 =10 ) म्हणजे त्यांना आठवड्यात एक दिवसाची अधिकची सुटी मिळेल असा प्रस्ताव होता .कर्मचारी संघटनांनाही तो पटला . त्यामुळे आय.टी कपन्यांमध्ये पाच दिवसाचा आठवडा आणि दररोज दहा तास काम ही पद्धत रूढ झाली आहे .
कर्मचारी कपातीचे संकट येऊ शकते
कर्नाटक स्टेट आयटी एम्प्लॉईज युनियन या कर्मचारी संघटनेने मात्र राज्यातील आयटी कंपन्यांच्या प्रस्तावाला विरोध केला आहे .कंपन्यांमध्ये सध्या तीन शिफ्ट मध्ये काम चालते हे काम तीन ऐवजी दोन शिफ्ट मध्ये करून घ्यायचा कंपन्यांचा डाव आहे .असे झाले तर एक शिफ्ट कायमची बंद होईल आणि 30 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट येईल . कर्मचाऱ्यांना दररोज 12 किंवा 14 तास काम करायला लावणे हे देखील योग्य नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे .
कर्मचारी यंत्र नव्हेत
कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे की कर्मचाऱ्यांचे मालक आणि सरकार कर्मचाऱ्यांना यंत्र समजतात का ? आय .टी . क्षेत्रातले बहुतांश कर्मचारी ताण – तणावांनी त्रस्त आहेत . अनेक कर्मचारी मानसिक किंवा शारीरिक आजारांचा सामना करीत आहेत .अशा स्थितीत त्यांना दररोज 14 तास काम करायला लावणे अमानवी आहे . पुन्हा वेठबिगारी सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे .
आठवडयात 55 तासांपेक्षा अधिक काम करणे आरोग्यासाठी घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे . 2016 ते 2021 चा काळात अधिक तास काम केल्याने 7 लाख 45 हजार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला . अधिक तास काम केल्याने हृदय विकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे .
कर्मचा-यांनी दररोज 14 तास काम करावे या आय.टी. कंपन्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर इतर क्षेत्रातही हा प्रकार रुढ होण्याचा धोका आहे.