प्रत्येकाने आवर्जून पाहायलाच हवा असा अप्रतिम चित्रपट
महाराष्ट्रातील एका खेळाडूची जीवनकथा सांगणा-या ‘चंदू चॅम्पियन ‘ या प्रेरणदायी चित्रपटा विषयी हा विशेष लेख लिहिला आहे , सोलापूर येथील चित्रपट अभ्यासक संध्या रघोजी यांनी
“चंदू चॅम्पियन ” म्हणजे क्रीडा विश्वातील एक अज्ञात हळुवार उघडलेले पान .कबीर खान दिग्दर्शित ( एक था टायगर ,बजरंगी भाईजान फेम ) चंदू चॅम्पियन चित्रपट पाहिला .सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यात जन्मलेले मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. पेटकर यांनी भारतातर्फे खेळताना पॅरा ऑलिम्पिक ( विविध देशातील अपंग ,दिव्यांग स्पर्धकांचे )स्पर्धेत जलतरण विभाग मध्ये सुवर्ण पदक पटकावले.
कार्तिक आर्यन या नेहमी विनोदी किंवा रोमँटिक भूमिका करणाऱ्या नटाने मुरलीधर पेटकर यांची भूमिका करताना या भूमिकेचे सोने केले आहे .त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट ठरेल असाच .खाशाबा जाधव यांना कुस्तीमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाल्यावर गावी परत आल्यावर त्यांचे हजारोंच्या संख्येने जंगी स्वागत ,सत्कार ,जल्लोष बघून भारावलेला लहान मुरली कुस्तीपटू होण्याचे स्वप्न बघतो .दारासिंग त्याचा आदर्श . वयाच्या 16 व्या वर्षी गावातील त्याचे कुस्ती प्रशिक्षक,शेजारील गावातील त्यांचे जावई यांच्यासोबत हरण्यासाठी मुरलीला पाठवितात ,पण मुरली कुस्ती जिंकतो .जावयाच्या गावातील लोक त्याला मारायला धावत मोठा पाठलाग करतात आणि जीव वाचविण्यासाठी मुरली धावत्या ट्रेन मध्ये बसतो .त्यात त्याला एक आर्मी मधील जवान करणेलसिंग भेटतो .तो त्याला ऑलिम्पिक तयारीसाठी आर्मी भरती साठी हैदराबाद येथे नेतो .
ऑलिम्पिक मध्ये कुस्ती हा खेळ नसल्याने कोच अली सर त्याला बॉक्सिंग मध्ये तयार करतात .( अली यांच्या भूमिकेत विजय राज यांचाही उत्तम अभिनय ) .तोवर मुरलीकांत पेटकर यांचे पोस्टिंग काश्मीर मध्ये होते आणि 1965 युद्धात मुरलीला 9गोळ्या लागतात .तो वाचतो तर खरे ,पण दोन वर्षे आर्मी रुग्णालयात शरीराची खालची बाजू पूर्ण पॅरालीसिस झालेली ,अधून – मधून शुद्ध जाणारी अवस्था. त्यामुळे आत्महत्येचे विचार मनात येतात .परंतु पुन्हा कडक , करारी कोच अली यांची भेट होते. तसेच हॉस्पिटल मधील वार्डबोय टोपाझ( राजपाल यादव ) ची प्रेरणा देणारी साथ त्याला जलतरण पटू होण्याचे आव्हान तो स्वीकारतो .दोन्ही पाय पूर्ण कमजोर असताना, हे नव्याने प्रशिक्षण आणि शेवट पॅराऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक चे स्वप्न पूर्ण होताना येणाऱ्या अडचणी याचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे हा चित्रपट . पेटकर नंतरच्या काळात टाटा टेल्को कंपनीत 30 वर्षे नोकरी करून निवृत्त झाले .
चित्रिकरणात जुना काळ ही खूप छान चित्रित केला. पार्श्व भागातील गाणी पण माहितीची प्रसिद्ध नाही तरी प्रभावी वाटतात .कबीर खान ने कथा छान थोडी फ्लॅशबॅक स्वरूपात मांडली आहे .2 तास 15 मिनिटांचा हा चित्रपट थोडा संथ वाटला तरी कंटाळवाणा अजिबात नाही . पंधरा – वीस मिनिटे चित्रपटाची लांबी कमी करता आली असती . चित्रपटाच्या शेवटी मूळ मुरलीधर पेटकर 2017 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना दाखविले आहेत. हे बघताना (अगदी काही सेकंद पुरते )अगदी मन भारावून जाते .महाराष्ट्रातील या काहीशा विस्मृती मध्ये गेलेल्या विजेत्याची कथा निश्चित प्रेरणादायी आहे . सर्वांनीच विशेषतः तरुणांनी अवश्य बघावा .
माझ्याकडून चित्रपटाला **** स्टार .
( संपादकीय टिपणी :महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट करमुक्त करायला हवा तसेच आठवीच्या पुढील वर्गातील सर्व शालेय विदयार्थ्यांना दाखवायला हवा.)