शिवाजी विद्यापीठातील परिषदेस प्रारंभ
कोल्हापूर : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अखिल मानवमात्राच्या कल्याणासाठी ज्ञाननिर्मिती करणारे आणि त्याचा वापरही करणारे विसाव्या शतकातील महत्त्वाचे प्रबोधनपुरूष होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार व कार्य’ या विषयावरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, तर्कतीर्थांचे पुतणे व अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी आणि नातू डॉ. अशोक खंडकर हे प्रमुख उपस्थित होते.
श्री. बेडकीहाळ म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांशी जैविक अर्थाने जोडलेले व्यक्तीमत्त्व होते. एकोणिसाव्या शतकातील फुले, रानडे, आगरकर, शिंदे, टिळक यांचा प्रबोधनाचा वारसा विसाव्या शतकामध्ये प्रवाहित करून नवमहाराष्ट्राचा विचार देशाला प्रदान करणाऱ्या पिढीचे शास्त्रीजी सच्चे वारसदार ठरले. आधुनिक प्रबोधनपर्वात कूस बदलणाऱ्या महाराष्ट्राचे साक्षीदार आणि त्या बदलांचे भागीदार बनणाऱ्या शास्त्रीजींनी हा कालखंड अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने मौलिक योगदान दिले. मराठी समाजाला जागतिक समुदायाशी जोडत असताना या समाजामध्ये वैश्विक जाणीवांची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. स्वतःच्या बौद्धिक स्वातंत्र्याबद्दल अत्यंत जागरूक असणाऱ्या शास्त्रीजींनी सर्व प्रकारचे ज्ञानग्रहण करून नव्या काळाला अनुकूल असे त्या ज्ञानाचे उपयोजन करण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्याचे आकलन आणि अनुसरण करण्याची आजघडीला मोठी गरज निर्माण झाली आहे.
तर्कतीर्थ जोशी यांचे पुतणे डॉ. अशोक जोशी म्हणाले, तर्कतीर्थ यांच्याकडे मी नेहमीच एक विचारमहर्षी म्हणून पाहिले. त्यांनी नेहमी आम्हा कुटुंबियांना बुद्धाचा सुखाचा मंत्र सांगितला. आपल्या डोक्यात नेहमी अमर विचार आले पाहिजेत, असे ते सांगत. अखिल मानवजातीच्या कल्याणाचा आणि कोणाविषयीही कोणताही भेदभावविरहित विचार हा अमर विचार असतो. या त्यांच्या सांगण्याचे आम्ही पालन करीत आहोत. त्यांनी आम्हाला आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच आंतरराष्ट्रीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. आम्ही आणि आमच्या मुलामुलींनीही सर्व प्रकारच्या भेदांना तिलांजली देत त्याचे अनुसरण केले आहे.

तर्कतीर्थांचे नातू डॉ. अशोक खंडकर म्हणाले, आजोबांचा मी सर्वात थोरला आणि त्यांच्याशी मैत्री असणारा मी नातू आहे. आमच्या वाईतील घरी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती तत्कालीन अस्पृश्य समाजातील असत आणि त्यांना समतेची आणि ममतेची वागणूक मिळे. सर्व प्रकारच्या धर्मशास्त्रांचा अभ्यास करून शास्त्रीजींनी आपले ज्ञान सर्व प्रकारच्या सनातन रुढींना विरोध करण्यासाठी वापरले. सर्व प्रकारचे भेद संपुष्टात येऊन समता प्रस्थापनेसाठी ते आग्रही राहिले. व्यक्तीगत जीवनात त्यांनी ते अंगिकारले. भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक विकासात योगदान देत असताना येथील सामाजिक-आर्थिक विषमतेची दरी कमी व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर्कतीर्थांच्या ज्ञानाचा, ज्ञानसाधनेचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी आजच्या अभ्यासक, संशोधकांनी उचलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. शिर्के आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, तर्कतीर्थांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अगदी एखादा पैलू जरी आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केला, तरी त्यांचे आयुष्यभराचे कल्याण होऊन जाईल. इंग्रजी भाषेचे ज्ञान संपादन करण्यासाठी बडोद्याला वेषांतर करून पलायन करणारा, अवघ्या तीन महिन्यांत ते आत्मसात करून परतणारा आणि पुढे हयातभर त्या भाषेतील ज्ञान एतद्देशीयांना देण्यासाठी झटापट करणारा महान अभ्यासक म्हणजे तर्कतीर्थ होत. हा एक पैलू झाला. याखेरीज संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी निर्माण केलेले ज्ञानसंचित अफाट आहे. त्यातील काही कण तरी विद्यार्थ्यांनी अंगावर पाडून घ्यावेत. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या विचारकार्याचे एकहाती संपादित केलेले १८ खंड ही भारतीय साहित्य-संस्कृती क्षेत्राला फार मोठी देणगी आहे. त्यांचे कार्य हे मानपत्रात न सामावणारे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा शाल, ग्रंथ आणि मानपत्र भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘मराठी विश्वकोष’ आणि ‘साहित्य आणि संस्कृती’ या दोन पुस्तिकांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत केले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रास्ताविक केले. अक्षय जहागीरदार यांनी मानपत्राचे वाचन केले. सुखदेव एकल व प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.
यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित टापरे यांच्यासह अनिल मेहता, डॉ. श्रीराम पवार, डॉ. दिलीप करंबेळकर, राजा दीक्षित, कौतिकराव ठाले-पाटील, अनुराधा पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. जी.पी. माळी, विश्वास सुतार, प्रवीण बांदेकर यांच्यासह अनेक मान्यवर अभ्यासक, संशोधक, शिक्षक, अधिविभागांचे प्रमुख आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.