सोलापूर येथे जानेवारीत विद्यापीठातर्फे आयोजन
सोलापूर, दि. 10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि ब्रिजमोहन फोफलीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30, 31 जानेवारी 2025 आणि 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये विद्यापीठात तीन दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी दिली.
21 व्या शतकातील तृतीयपंथीयांचे जीवन: प्रगती, समता, आरोग्य आणि जगभरातील सांस्कृतिक रुची या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत ‘बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन’ यामधून तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद विद्यापीठात होणार आहे. या परिषदेसाठी विद्यापीठाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक म्हणून प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि समन्वयक म्हणून डॉ. प्रभाकर कोळेकर हे काम पाहत आहेत. याचबरोबर तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या डॉ. सानवी जेठवाणी, डॉ. योगा नंबीगार, प्रेरणा वाघेला, डॉ राजन गवस यांचाही सल्लागार समितीत समावेश आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारतासह संपूर्ण जगातील अध्यापक व संशोधकांना सहभाग घेता येणार आहे. याचबरोबर संशोधन पेपर देखील सादर करता येणार आहे. संशोधन पेपर सादर करण्यासाठी दि. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत गोषवारा सादर करणे आवश्यक आहे. दि. 20 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण पेपर जमा करणे आवश्यक आहे. दि. 25 डिसेंबर 2024 पर्यंत सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.
तृतीय पंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य आणि त्यांच्या समस्या बाबत तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चर्चा होईल, मंथन होईल. या परिषदेमध्ये जगभरातील अध्यापक, संशोधक व तृतीय पंथीयांचा सहभाग असेल.
पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिजमोहन फोफलीया यांचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. अधिकाधिक जणांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवावा असे आवाहन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले आहे .