जळगावच्या हर्षाली चौधरी यांची ही कहाणी आहे. पती, पत्नी, एक मुलगा रूशील व घरातील परिवार असे त्यांचे सुखी कुटूंब. रूशील सात वर्षाचा असताना त्याला आरोग्यविषयक अडचण निर्माण झाली. त्यावर खूप सारे उपचार केले. वर्षभरानंतर रूशील या आजारातून बरा झाला , मात्र डॉक्टरांनी स्पष्ट केले की, रुशील ची बौध्दिक समज कमीच राहील. त्याच्या मेंदूला इजा झाली असून तो एक स्पेशल चाईल्ड आहे. रुशील ची प्रगती व्हावी म्हणून आम्ही अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल, स्पेशल कोर्सेस, वेगवेगळ्या थेरीपी अगदी बॉर्नम्यॅरो, स्टेमसेल्स थेरीपी इत्यादी सर्व केले. यातून फारसा फरक पडला नाही. पण तो काही प्रमाणात स्थिरावला.
अन् उडाण ची स्थापना झाली
हर्षाली सांगतात “संस्था स्थापन केल्यानंतर सर्वात मोठी अडचणी आली ती आर्थिक कमतरतेची. प्रारंभापासून पदरमोड करून कामास सुरवात केली. संस्थेत दाखल झालेल्या दिव्यांगांच्या पालकांनीही मदत करणे सुरू केले. संस्थेची नविनच सुरवात असल्याने खूप अडचणी आल्या. जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी एक फ्लॅट भाड्याने घेवून तेथे या सर्व मुलांची व्यवस्था केली. मदतीला काही जणांना सोबत घेतले. त्यांच्या सहकार्याने या मुलांना प्रशिक्षित करून त्यांना” शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात सादर केले. त्यातून संस्थेची व संस्थेच्या कार्याची ओळख निर्माण झाली, लोकांचा विश्वास बसला. त्यामुळे विविध स्वरूपात मदत मिळू लागली. आम्हालाही यामुळे कामाला हुरूप आला”.
हर्षाली चौधरी सांगतात की, “एका दिव्यांग बालकाच्या पालकांची होणारी धावपळ आणि त्यांना येणाऱ्या अडचणी अगदीच जवळून बघितल्या. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील पालक या स्पेशल मुलांच्या सर्वच बाबतीत दूर्लक्ष करत असतात. त्यांना जीवन नकोसे वाटते असे माझ्या लक्षात आले, यावरचे सर्व उपचार मोठ्या शहरातच आहेत आणि अतिशय महाग आहेत. सर्वांनाच मोठ्या शहरात जाणे शक्य नाही. तेव्हा दिव्यांगांची व्यथा, पालकांना येणाऱ्या अडचणी बघता मी आणि आमच्या संपूर्ण कुटूंबाने आपल्या गावाकडे दिव्यांग मुलांना या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरविले. काही दिव्यांगांच्या पालकाना सोबत घेऊन कुटूंबाच्या स्व:खर्चाने रुशील मल्टीपर्पज फॉउंडेशन संचलित ‘उडान’ ची निर्मिती केली”.
स्वावलंबनाचे धडे
विशेष गरजा असणाऱ्या या मुलांना साक्षर करण्यापुरते काम करुन हर्षाली थांबल्या नाहीत, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याकडेही त्यांनी लक्ष दिले. याबाबत त्या सांगतात की ही मुले परिवारावर ओझे होता कामा नये. या बालकांच्या विशेष गरजा असल्या तरी या प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही वेगळेपण व वेगळी कलाकुसर , आवड आहे. त्या ओळखून त्यांना त्यानुसार प्रशिक्षण दिले. त्यामुळे ही मुले आपल्या आवडीच्या कामात ‘ आनंद’ शोधू लागले. कोणाला चित्रकला आवडते, तर कोणला रंगकाम, तर कोणाला विविध वस्तू तयार करायला आवडतात. त्यानुसार त्यांना त्यांच्या आवडीनुसार शिकवले आणि मुले सहज शिकलीत.
आज रोजी उडान दिव्यांग अर्ली इंटर्व्हशन सेंटर मध्ये 0 ते 6 वयातली 35 मुले- मुली ,तर उद्योग प्रशिक्षण केंद्रात 50 मुले- मुली प्रशिक्षण घेत आहेत. 20 मुलांनी त्यांचे स्वतःचे उडान दिव्यांगचे दोन बचतगट निर्मान केले .आज ही मुले स्वतः च्या पायावर उभीआहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे, दिव्यांगा चा सामाजिक, बौध्दिक, शारीरिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे हाच उडान चा मुख्य उद्देश असल्याचे हर्षाली सांगतात.
दिव्यांगांनाही दिले व्यासपीठ
‘उडान’ अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून दिव्यांगाना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. चॉकलेट, बुके, अगरबत्ती, कंदील, तोरण, पतंग, दिवे अशी साधारण 70 प्रकरची उत्पादने उडान मध्ये तयार होतात. त्यातून या स्पेशल मुलांना रोजगार, तसेच दिव्यांगाना स्पीच थेरपी, रेमिडीयल, फिजिओ थेरीपी, स्पेशल एज्युकेशन अशा विविध सुविधा दिल्या जातात. यासाठी अनेक डॉक्टर्स उडानला जोडले गेले आहेत. त्याशिवाय उडान दिव्यांग सहायता केंद्रात दिव्यांगाच्या कुठल्याही अडचणीवर मदत केली जाते. रुशील मल्टीपर्पज फॉउंडेशन संचलित
1) उडान अर्ली इंटर्व्हशन 2)उडान दिव्यांग दिव्यांग डे केअर सेंटर 3)उडान कौशल्य विकास केंद्र
4) उडान दिव्यांग मदत सहायता केंद्र 5) उडान दिव्यांग बचत गट 6)उडान दिव्यांग उदयोग केंद्र
असे 6 युनिट दिवसभरात चालू असतात. उडान दिव्यांगाचे स्वावलंबनाचे जणू काही विद्यापीठच बनले आहे.
उच्च शिक्षित हर्षाली चौधरी
हर्षाली चौधरी या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी हॉटेल मॅनेजमेन्ट अभ्यासक्रम पूर्ण केला असून, त्या उत्कृष्ट शेफ आहेत. अनेक मराठी चॅनल वर त्यांनी शो केले आहेत. तसेच आर्ट अँड क्राफ्ट डिप्लोमा तसेच चिल्ड्रेन डेव्हलपमेंट विषयात मध्ये पदवीधरआहेत. चाईल्ड अर्ली इंटर्व्हशन विषयातही पदवीधर आहेत.
दु:खातही शोधताहेत ‘त्यांचा’ आनंद
हर्षाली चौधरी यांचा मुलगा रूशील याचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. ज्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, त्याच्या सुखासाठी जीवाचे रान केले तो आता नसल्याचे दु:ख मनात ओतप्रोत भरलेले आहे. असे असतानाही त्या खचल्या नाहीत, घेतलेला वसा सोडला नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि उडाण मधील सर्व मुलांमध्ये त्या रूशील शोधून त्यांच्या आनंदासाठी पुन्हा नव्याने लढाई सुरू केली. ही लढाई केवळ या दिव्यांग मुलांसाठीचीच नव्हे तर त्यांच्या आयुष्याचीही आहे. कोणतीही शासकीय मदत नसताना त्यांनी व त्यांच्या परिवाराने हे शिवधनुष्य उचलेले आहे. समाजाने स्वत:हून दिलेल्या मदतीने व पदरमोड करून दिव्यागांना उडाण घेण्यासाठी सिध्द करत आहेत.
सत्पात्री मदतीची अपेक्षा
हे कार्य करताना त्यांना आर्थिक मदतीची गरज तर लागलीच शिवाय या मुलांवर औषधोपचार, त्यांच्या तपासण्या, त्यांना खेळण्यासाठीचे विविध साधने, कपडे यासारख्या वस्तूरुपात मदत लागत असते. त्यासाठी त्या प्रयत्नही करत असतात. काहीजण त्यांना मोठ्या मनाने मदत करतात . मात्र पुरेशी मदत मिळत नसल्याने मग या मुलांचे कसे होईल हा विचार त्यांच्या मनात येतो. त्या म्हणतात, मी जे करत आहे त्यात पैसे कमावणे हा उद्देश नाही. माझा मुलगा रूशील नसला तरी हे काम करत आहे. आतापर्यंत कोणतेही शासकीय अनुदान घेतले नाही. कारण त्यासाठीची प्रक्रिया मोठी आहे. समाजातील दानशूरांकडून आदराने, प्रेमाने जी मदत मिळेल त्यावर उडाणची भरारी घेत आहे.
मदतीसाठी संपर्क
हर्षाली चौधरी यांच्या कार्यास मदत करावयाची असल्यास 9403832541 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
मुलाखत : शब्दांकन – डॉ. पंकज पाटील (7588822126)