समस्तीपूर ( बिहार ) – बिहार राज्यातील समस्तीपूर रेल्वे स्थानकावर दोन माकडांच्या प्रतापामुळे रेल्वे वाहतूक एक तास ठप्प झाली होती. दोन माकडांमद्ये फ्रीस्टाईल हाणामारीमुळे हा प्रकार घडला.
6 डिसेबर 2024 रोजी समस्तीपूर जंक्शनवर प्लॅटफॉर्म-4 वर दोन माकडांमध्ये हिंसक चकमक होऊन एक विचित्र घटना घडली. हाणामारीत एका माकडाने टोपली उचलली आणि दुसऱ्या माकडावर फेकली, जो वरच्या तारात अडकला होता. यामुळे शॉर्टसर्किट होऊन वायर तुटून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यावर पडली. त्यामुळे समस्तीपूर-मुझफ्फरपूर मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे एक तास विस्कळीत झाली होती.
माकडांमधील हिंसक चकमकीचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, एका माकडाने प्लॅटफॉर्म-4 वर एका प्रवाशाकडून केळी हिसकावली आणि दुसऱ्या एका माकडाने ती घेऊन त्याच्यावर हल्ला केला. दोन माकडांमधील या हाणामारीने इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की एका माकडाने एक टोपली उचलून दुसऱ्या माकडावर फेकली. टोपली ओव्हरहेड वायरवर पडली, ज्यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि वायर तुटून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यावर पडली. परिणामी, वीजपुरवठा खंडित झाला आणि या मार्गावरील गाड्या थांबवण्यात आल्या.
या घटनेनंतर लगेचच रेल्वेच्या विद्युत विभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली. त्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, समस्तीपूर-मुझफ्फरपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती. बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेससह अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. संपर्क क्रांती एक्स्प्रेसला देखील शॉर्टसर्किटमुळे 15 मिनिटे उशीर झाला.
या घटनेनंतर, समस्तीपूर स्थानकावर माकडांच्या उपस्थितीमुळे प्रवासी आधीच अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर वनविभागाला मदतीसाठी बोलावण्यात आले. काही माकडे पकडली गेली, परंतु तरीही ती स्थानकावर परत आली.