ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांनी इंग्लंडच्या भेटीवर आहेत. त्यांनी फेसबुकवर ‘लंडन डायरी’ या शीर्षकाखाली लेखमाला लिहिली आहे. त्यातील थेम्स नदीविषयीचा भाग प्रेरणादायी आहे. तो भाग एस.एम. देशमुख यांच्या फेसबुक भिंतीवरुन सााभार देत आहोत, त्यांच्याच शब्दात.
“लंडन ब्रिज” वर आम्ही पोहोचलो तेव्हा “सायंकाळ” चे साडेआठ वाजले होते.. “सायंकाळ” हा शब्दप्रयोग यासाठी केला आहे की, रात्रीचे साडेआठ वाजले असले तरी अजून सूर्यास्त झालेला नव्हता..मावळतीला निघालेल्या सूर्याची कोवळी किरणं थेम्स नदीच्या पाण्यावर आणि लंडन ब्रिज वर पसरली होती.. पाण्यावरून परावर्तीत होणारया सोनेरी किरणांमुळं सारा परिसर पिवळाधम्मक दिसत होता. आम्ही लंडन ब्रिज वर उभे होतो आणि समोर जगप्रसिद्ध टॉवर ब्रिज दिसत होता.. सारं दृश्य अप्रतिम होतं.. लंडनला येताना वळणं घेत दिमाखात वाहणारी थेम्स नदी विमानातून जेवढी मोहक दिसत होती त्यापेक्षा ती जवळून कितीतरी सुंदर दिसत होती.. किती तरी वेळ मी एकटक थेम्सकडं पहात होतो..
लंडनमध्ये सध्या उन्हाळाय .. त्यामुळं फारशी थंडी नसली तरी मराठवाड्यातल्या 44 डिग्री सेल्सिअस उन्हाची सवय असलेल्या आम्हाला वाहणारा गार वारा देखील अंगाला झोंबत होता.. त्याची मात्र चिंता नव्हती.. थेम्स नदी आणि लंडन ब्रिज ही नावं आयुष्यात एवढ्या वेळेला ऐकली होती आणि त्याचं एवढं कुतूहल होतं की, आपण लंडन ब्रिज वर आहोत या कल्पनेनंच आम्ही तहान भूक, थंडी वारा सारं विसरलो होतो..देहभान हरपून सारा नजारा डोळ्यात साठवत होतो, कॅमेरयातही बंद करीत होतो..स्वप्नवत वाटत होतं हे सारं……
“जगातील सर्वात प्रतिष्ठीत नदी” असा इंग्रज थेम्स चा अभिमानानं उल्लेख करतात.. ते खरंही आहे.. कारण थेम्स हे नाव ऐकलं नाही असा शिक्षित माणूस जगात सापडणार नाही.. एवढी ख्यातकीर्त अशी ही नदी आहे..आपल्या गंगेसारखीच.. थेम्सचं धार्मिक, अध्यात्मिक महत्व काय हे मला माहिती नाही पण आपलं गंगा, गोदावरीवर जेवढं प्रेम,श्रध्दा आहे तेवढंच प्रेम इंग्रज थेम्स नदीवर करतात..थेम्सचं इंग्रजांना केवळ भूषणच वाटतं असं नाही तर या नदीची इंग्रज मायेनं जपवणूक देखील करतात… लंडन ब्रिज वर उभं राहून मी थेम्स नदीचं बारकाईनं निरिक्षण करीत होतो.. नदीचं पाणी बरयापैकी स्वच्छ होतं.. जलपर्णी वगैरे कुठे दिसते का? याचा शोध माझी नजर घेत होती पण माझा भ्रमनिरास झाला.. असं काही दिसलं नाही.. नदीच्या विस्तीर्ण पात्रातलं पाणी जसं निर्मळ तसंच दोन्ही बाजुंनी काठावर कमालीची स्वच्छता..
वाटत होतं,”लंडन ब्रिज वरून एक सुळकी मारून मस्त थेम्स मध्ये डुंबत राहावं” ..
सागर म्हणाला, “नदीत पोहायला परवानगी नाही” .. नदीत घाण, कचरा, प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या दूर दूर पर्यत कुठं दिसल्या नाहीत.. लंडन शहरातलं घाण पाणी थेम्स मध्ये सोडलं जातं का? याचं कुतूहल होतं..तेही कुठं दिसत नव्हतं.. एका इंग्रजाला त्याबाबत विचारणा केली असता त्यानं नाही असं उत्तर दिलं.. लंडन ब्रिजवरून थेम्सकडं पाहताना आपली मुळा, मुठा जशी आठवली तव्दतच आमची बीडची बिंदुसरा देखील आठवली..आपल्या नद्यांची झालेली दयनीय अवस्था आणि दिमाखात वाहणारी थेम्स यांची तुलना होऊ शकत नाही.. भारतात नदयांबाबत निश्चित धोरण नाही.. किंबहुना नद्यांची जपवणूक, त्यांची उपयुक्तता हा विषयच सरकारच्या अजिंडयावर नाही.. त्यामुळं भारतात नद्यांवर चोहोबाजुंनी अतिक्रमणं करून नद्यांचे नाले करून टाकले गेलेत ..याला मोठ्या नद्या देखील अपवाद नाहीत..ही स्थिती पुढील काही काळ अशीच राहिली तर “इथे कधी काळी नदी होती” असे फलक लावावे लागतील हे नक्की..
नद्या म्हणजे कचराकुंडया.. अशीच आपल्या व्यवस्थेची समजूत असावी .. त्यातूनच शहरातली सगळी घाण निर्दयपणे नद्यांमध्ये सोडून सगळ्या नद्या दुषित केल्या गेल्या आहेत….गाळानं भरलेल्या या नद्या उथळही झाल्यात.. परिणामतः थोडा पूर आला तरी पाणी पात्राबाहेर पडते आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.. आपल्या कोकणात अलिकडे जे वारंवार पूर येतात त्याचं हेच कारण आहे..नद्यांची सर्वार्थानं अक्षम्य हेळसांड सुरू असल्यानं चिंता वाटते.. बिंदुसरेच्या पुलावर उभं राहून बघा, सभोवतालचा देखावा पाहवत नाही.. पुण्यातील मुळा-मठाच्या पुलावर उभं राहिलं की, राज्यकर्त्यांना चार-दोन शिव्या घातल्याशिवाय राहवत नाही..अशी स्थिती.मुळा मुठा जगल्या पाहिजेत यासाठी महापालिका काहीच करताना दिसत नाही.. जलपर्णीनं वेढलेल्या या नद्यांचा दिमाख आपण घालवून टाकला आहे..खरं म्हणजे थेम्स नदी लंडनचं वैभव आहे तव्दतच आमची मुळा- मुठा देखील पुण्याचं वैभव आहे..मात्र हे वैभव जपावं असं कोणत्याच राज्यकर्त्यांना कधी वाटलं नाही,.. वाटत नाही..
हे आपलं दुर्दैव आहे..
लंडनचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्यानं वस्ती थेम्स च्या दोन्ही बाजुंनी पसरलीय ..आज शहराच्या मधून ही नदी वाहते.. नदी बारमाही प्रवाहीत असते.. नदीची खोली किती आहे, माहिती नाही मात्र मोठी जहाजं आजही येथून ये जा करतात यावरून आपण खोलीचा अंदाज करू शकतो. बोटीतून ,अत्याधुनिक कॅटमरान मधून थेम्सच्या अंगाखांद्यावर मुक्त विहार करणारे पर्यटक पाहिले म्हणजे मुळा-मुठात असं काही करता येणार नाही का? असाही प्रश्न मनाला स्पर्श करून गेला.. 346 किलो मिटरची ही दक्षिण वाहिनी ग्लुशेस्टरशायर येथे उगम पाऊन एस्च्युअरी येथे सागराला मिळते.. उगमापासून युकेतील अनेक मोठी शहरं थेम्स च्या काठावर वसलेली आहेत.इंग्लंडमधील सर्वात लांब आणि युकेतील दुसरया क्रमांकाची सर्वात लांब नदी अशी या नदीची ख्याती आहे.
नदीवर एका बाजूकडून दुसरया भागात जाण्यासाठी ऐतिहासिक लंडन ब्रिज आणि टॉवर ब्रिज असे दोन सेतू आहेत..लंडन जेवढं ऐतिहासिक आहे, तेवढीच थेम्स पुरातन आणि या नदीवरचा लंडन ब्रिज ऐतिहासिक आहे.. म्हणूनच या दोन्ही गोष्टी इंग्रज प्राणपणानं जपतात..
तुम्ही लंडनला आलात आणि थेम्सचं दर्शन न घेता परतलात तर तुमचा दौरा अपूर्णच राहिला असं किमान मला तरी वाटतं..
थेम्सच्या दर्शनानं मी तृप्त झालो हे खरंच