Saturday, January 17, 2026
Homeशिक्षणबातम्यानदी हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : मनोज बोरगावकर

नदी हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : मनोज बोरगावकर

कोल्हापूर, दि. ९ जानेवारी: नदी हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन ‘नदीष्ट’ या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित ‘लेखक मुक्तसंवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.

बोरगावकर म्हणाले, निसर्ग वाचणं हीच एक अद्भुत गोष्ट असते. तो आनंद अपूर्व असतो. यासाठी मात्र लेखकाने इमान शाबूत ठेवायला हवे. निसर्गाशी नाते जोडायला हवे. यातूनच मी नदीशी जोडला गेलो. नदी हे आईचे रूप आहे. त्यामुळे नदी वाहती राहिली पाहिजे. मी जे केलं ते अंत:करणातून. गोदामायने व तिथल्या निसर्गाने मला लिहिण्याची प्रेरणा दिली. माझ्या कादंबरीतील घटना या प्रत्यक्ष जीवनाशी निगडित आहेत. सगुणा ही या कादंबरीचा कणा आहे. स्त्री, आई, कविता आणि नदी ही मला एकसारखीच वाटते. यामुळेच नदी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. त्यामुळेच जीवनातील एक कवडसा शोधता आला.अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, ‘नदीष्ट’मध्ये मातृत्वाचे एक रूप आणि दुसरे जीवनाचे रूपक आढळते. यातून मानवाचा प्रवास ध्यानात येतो. ही कादंबरी पर्यावरण, सामजिक जाणीव आणि मानवी सहसंबंधांचा शोध घेते. कादंबरी लेखकाची विज्ञानविषयक निरीक्षणे ही वाखाणण्यासारखी आहेत. ही कादंबरी वाचकांचे वाचनभान समृद्ध करणारी आहे.

मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रांजली क्षीरसागर यांनी केले. आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले. यावेळी प्रा. नंदकुमार मोरे, प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, कृष्णा दिवटे, सुषमा शितोळे, डॉ. कृष्णात पाटील, डॉ. केदार मारुलकर, प्रा. जयसिंग सावंत, अनिल साबळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments