गतवर्षीच्या तुलनेत नीलगायींची संख्या वाढली
नान्नज्( जि. सोलापूर ) – माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज, सोलापूर येथे 22 आणि 23 मे 2024 रोजी वन्यजीव प्रगणना करताना गंगेवाडी येथे एक माळढोक पक्षी दिसल्याने पक्षीप्रेमी आनंदून गेले आहेत.
महाराष्ट्र वन विभागातर्फे ‘निसर्गानुभव आणि वन्य प्राणी प्रगणना’ या विषयावर 21 मे 2024 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी 22 मे दुपारी 3:00 वाजेपासून ते 23 मे रोजी दुपारी 3:00 असा एकुण 24 तासांचा वन्यजीव प्रगणना उपक्रम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून राबविला.
नान्नज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील नान्नज, वडाळा, मार्डी, गंगेवाडी हिरज, नरो टेवाडी सह एकुण 24 ठिकाणी पाणवठ्यावरील लपणगृह, माळरानावरील मचाण आणि निरिक्षण गृहातुन ३० वन अधिकारी आणि कर्मचारी, ९ अशासकीय संस्था सदस्य, सातारा, कर्नाटक मधील प्राणी प्रेमी यांनी निसर्ग अनुभव उपक्रमात सहभाग नोंदवत प्राणी गणना नोंदवली.
सोलापूरच्या गवताळ जंगलाची वन्य प्राणी विविधता.
माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिसरात माळरान आणि पाणवठ्यावर वनकर्मचारी स्वयंसेवक आणि हालचाल टिपणारे स्वयंचलीत कॅमेर्याद्वारे विविध प्राणी, पक्षीयांची नोंद झाली आहे. यामधे प्रामुख्याने लांडगा, खोकड, काळवीट, निलगाय, आणि अभयारण्याचे आकर्षण असलेल्या माळढोक यांची हालचाल नोंदली गेली.
या उपक्रमांद्वारे घेण्यात आलेल्या नोंदीमधे आढळून आलेल्या वन्य
प्राण्यांबद्दल प्राथमिक नोंदी (प्रजाती व संख्या) पुढील प्रमाणे.
अनु क्र | वन्यजीवाचे नाव | संख्या |
1 | माळढोक (मादी) | 1 |
2 | लांडगा | 8 |
3 | खोकड | 13 |
4 | मुंगूस | 5 |
5 | रानमांजर | 5 |
6 | रानटी ससा | 11 |
7 | रानडुक्कर | 149 |
8 | सायाळ | 1 |
9 | कोल्हा | 4 |
10 | घोरपड | 2 |
11 | मोर | 61 |
12 | काळवीट | 362 |
13 | नीलगय | 6 |
वरील माहिती ही प्राथमिक स्तराची आहे .सविस्तर नोंदीचा अभिप्राय व अहवाल नंतर देण्यात येणार असले बाबत अधिका-यांनी कळविले आहे.
यावर्षीची माळढोकच्या अस्ति त्वाची अधिकृत नोंद.
या निसर्ग अनुभव प्राणी प्रगणने मधे उत्सुकता लागली होती ती माळढोकचे अस्तित्व शोधण्याची.सबंध महाराष्ट्रातील माळढोक पक्षी अस्तित्वाची नोंद असलेले सोलापूर आणि विदर्भ ही दोन ठिकाणे आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एक- एक पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत. यावेळी माळढोकने आपली ऐटदार उपस्थिती लावली आणि आपले अधिकृत अस्तित्व दाखवले.
मार्गदर्शन आणि आयोजन
या निसर्ग अनुभव उपक्रम प्राणी प्रगणनेसाठी तुषार चव्हाण (उपवनसंरक्षक वन्यजीव, पुणे), स्नेहल पाटील (उपविभागीय वनाधिकारी), किशोरकुमार येळे (सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी जावळे वनपरिक्षेत्र अधिकारी नान्नज, वनपाल जी डी दाभाडे, संतोष मुंढे, वनरक्षक अशोक फडतरे, विवेकानंद विभुते, सुनील थोरात, सत्वशीला कांबळे, ललिता बडे यांनी उपक्रम राबवला उपक्रम यशस्वी करण्यासाठी बी एन एच एस चे उपसंचालक डॉ. सुजित नरवडे, जी आय बी फाउंडेशन चे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांनी कार्यशाळेसह उपक्रमाचे नियोजन केले