बडोदा : मराठी वाङमय परिषद बडोदा या संस्थेचे हे वर्ष अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाचे आहे. १९३१पासून ही साहित्य संस्था दरवर्षी साहित्यसंमेलनाचे आयोजन करत आलीय. या वर्षी ७५व्या साहित्यसंमेलनाचे आयोजन १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी बडोद्यात होणार आहे. या अमृतमहोत्सवी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री. बाबा भांड यांची निवड मराठी वाङ्मय परिषदेने केली आहे. संमेलनाचे उद्घाटन राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड करणार आहेत.मराठी वाङ्मय परिषद बडोदा ही संस्था गेल्या नऊ दशकांपासून महाराष्ट्राबाहेर मायमराठीचे जतन व संवर्धन करण्याचे काम करत आहे. आतापर्यंत ७४ साहित्यसंमेलने बडोद्यात झाली आहेत. या वर्षीचे पंच्याहत्तरावे अमृतमहोत्सवी साहित्यसंमेलन महाराजा सयाजीराव गायकवाड यांना समर्पित करीत आहोत, असे या परिषदेने कळविले आहे. ही संस्था १९३१पासून भाषा, साहित्य, संस्कृती व समाजप्रबोधनाचे काम करत आहे.बडोदा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी साहित्य, कला, सामाजिक सुधारणा आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात डोंगराएवढे काम केले आहे. त्यांच्या कालखंडात ७५०० ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. ८९ कोटींची शिष्यवृत्ती दिली गेली. ग्रंथ, ग्रंथागार, ग्रंथालयांचे पोशिंदे आणि स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे म्हणून या दूरदृष्टी राजाने काम केले. ती नवी ओळख महाराष्ट्रच नव्हे तर भारताला करून देण्याचे काम बाबा भांड आणि त्यांचे साथीदार लेखकांनी कर्तव्यसाधना म्हणून केले आहे.मराठी वाङ्मय परिषद बडोदे यांच्या आतापर्यंतच्या ७४ संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक, विचारवंतांची निवड केली. त्यातील – न.चिं. केळकर, माडखोलकर, फडके, खांडेकर, पु.लं.देशपांडे, प्र.के.अत्रे, न.र.फाटक, सावरकर, तर्कतीर्थ, ग.दि.मा., कुरुंदकर, वा.ल. कुलकर्णी, इतिहासकार पगडी, पाडगावकर, दिलीप चित्रे, माधव गडकरी, गो.नि.दांडेकर, भालचंद्र नेमाडे, द.मा.मिरासदार हे काही मान्यवर संमेलनाध्यक्ष होते.या वर्षीच्या अमृतमहोत्सवी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून बाबा भांड यांची निवड केली असे परिषदेचे कार्यवाह श्री. संजय बच्छाव यांनी पत्राने कळविले आहे. बाबा भांड यांनी कथा, कादंबरी, ललितगद्य, चरित्र, प्रवासवर्णन, बालसाहित्य, संपादन या वाङ्मयप्रकारात १४९ विविध ग्रंथांचे लेखन व ३० ग्रंथांचे संपादन केले आहे. लेखनासोबत साकेत प्रकाशन या संस्थेचे संचालक म्हणून गेली पन्नास वर्षे काम करत आहेत.बाबा भांड यांनी बडोद्याचे युगद्रष्टा महाराजा सयाजीराव या दूरदृष्टी राजांची ओळख भारतास नव्याने करून दिली आहे. लक्ष्मी व सरस्वती कृपाछत्र लाभलेल्या या राजाने सर्व क्षेत्रांत प्रचंड काम केले. या कार्याची ओळख करून देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड समितीने १०१ खंड प्रकाशित केले. साहित्य संस्कृती मंडळ, सयाजीराव ट्रस्ट अन् साकेत प्रकाशनाने सयाजीरावासंबंधी १४१ ग्रंथ प्रकाशित केले. आतापर्यंत साठ हजार पृष्ठाहून अधिक पानांचे २५० ग्रंथ बाबा भांड आणि त्यांच्या साथीदारांनी केले. हे ग्रंथ बडोदा संमेलनात वाचकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.