आता कशाला परदेशाची बात, भारतातच घ्या परदेशी पदवी
भारतात परदेशी विद्यापीठे येण्यास सुरुवात झाली आहे, याविषयी वाचा रवींद्र चिंचोलकर यांचा विशेष वृत्तांत
भारतातील 8 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी परदेशात शिकायला जातात, एकंदर 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सध्या परदेशात शिकत आहेत. मात्र आता परदेशी विद्यापीठेच भारतात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता परदेशी विद्यापीठांची पदवी भारतात राहूनच घेण्याची सोय झाली आहे. जून 2024 मध्ये भारतात पहिल्या परदेशी विदयापीठाने प्रवेश केला आहे.
भारतीय विद्यापीठांमध्ये आधीच मोठी स्पर्धा आहे. केंद्र सरकारने परदेशी विदयापीठांना भारतात कॅम्पस निर्माण करुन विविध अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिल्याने ही स्पर्धा खूपच वाढणार आहे. या निर्णयामुळे भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर कोणते परिणाम होतील ते येत्या काही वर्षात स्पष्ट होईल.
परदेशात शिकतात 15 लाख भारतीय विद्यार्थी
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रश्न क्रमांक 2650 च्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 मध्ये सुमारे 15 लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. ही संख्या सातत्याने वाढतेच आहे. अमेरिकेने चीनच्या विद्यार्थी संख्येवर नियंत्रण घालून भारतीय विद्यार्थ्यांना प्रााधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही संख्या वाढतच जाण्याची शक्यता आहे.परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 2019 मध्ये, ही संख्या 8 लाख होती आणि 2024 पर्यंत ही संख्या 18 लाख पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.भारतीय विद्यार्थ्यांची जिथे शिकण्याची इच्छा आहे त्यात कॅनडा , अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे आवडते देश आहेत. परदेशी विद्यापीठेच भारतात आल्याने हा ओघ कमी होतो का ? याची उत्तरे पुढील काही वर्षात मिळू शकतील .
विद्यार्थ्यांना मिळणार परदेशी पदवी
परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस निर्माण करता येतील यासंदर्भातील नियमावली यू.जी.सी. ने 2023 मध्ये जाहीर केली. या नियमावलीनुसार जागतिक मानांकनाच्या क्रमवारीत पहिल्या 500 मध्ये असणाऱ्या विद्यापीठांना भारतात आपले कॅम्पस सुरू करता येतील. यू.जी.सी. परदेशी विद्यापीठांना सुरुवातीला दहा वर्षांसाठी मान्यता देणार आहे. या विद्यापीठांना विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. त्या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवणे, प्रवेश नियम ठरविणे , शिक्षकांची भरती याबाबत स्वायत्तता असणार आहे. या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातील नव्हे तर ती संस्था ज्या देशातील आहे त्या देशातील ,त्या विद्यापीठाची पदवी मिळणार आहे .त्यामुळे आता उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज नाही. भारतात राहून आणि भारतात शिकून ते परदेशी विद्यापीठाची पदवी आता घेऊ शकतात .
शिक्षण तज्ञांना चिंता
परदेशी विद्यापीठांना भारतात प्रवेश देताना या विद्यापीठांना अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवणे, प्रवेश नियम ठरविणे , शिक्षकांची भरती याबाबत स्वायत्तता दिली आहे. भारतातील विद्यापीठांवर मात्र बंधने आहेत. यामुळे बरोबरीची स्पर्धा न होता प्रश्न वाढतील अशी चिंता भारतीय शिक्षणतज्ञांनी व्यक्त केली आहे. यापेक्षा भारतीय आणि परदेशी विद्यापीठांना संयुक्त अभ्यासक्रम राबविण्याची परवानगी देणे योग्य ठरले असतेअसे त्यांचे मत आहे.
गुजरातेतून झाली सुरुवात
भारतात परदेशी कॅम्पस स्थापित करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला आहे. या देशातील डीकिन युनिव्हर्सिटीने नुकतेच गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे आपल्या कॅम्पसचे उद्घाटन केले आहे. विद्यार्थ्यांना आता या विद्यापीठात मास्टर ऑफ बिझनेस ॲनालिटिक्स आणि मास्टर ऑफ सायबर सिक्युरिटी (प्रोफेशनल) शिकण्याची संधी मिळणार आहे. हा अभ्यासक्रम यावर्षी जुलैपासून सुरू होणार आहे.सायबर सिक्युरिटीमधील मास्टर्स प्रोग्राममधील 100 जागांसाठी 3,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क सुमारे 25 हजार डाॅलर्स आहे.