Home अर्थकारण भारताने सामान्यांचे जीवनमान उंचावणारी अर्थनीती अवलंबावी

भारताने सामान्यांचे जीवनमान उंचावणारी अर्थनीती अवलंबावी

0
11

डॉ . नरेंद्र जाधव यांची अपेक्षा

कोल्हापूर – अर्थसत्ता बनण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीचा भारताने अवलंब करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने डॉ. जाधव यांना आज प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, शाल आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरुप होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. नरेंद्र जाधव यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य: संधी व आव्हाने’ या विषयावर अत्यंत तपशीलवार विवेचन केले. भारताच्या आर्थिक विकासाच्या जमेच्या बाजू अधोरेखित करीत असतानाच त्यावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक बाजूंचा वेध त्यांनी घेतला आणि त्यावरील उपायांचेही मुद्देसूद सूचन केले. ते म्हणाले, भारत आज लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा सर्वाधिक लाभार्थी आहे, अशी मांडणी सातत्याने केली जात आहे आणि ती खरीही आहे. कारण भारताचे सरासरी आयुर्मान आज २८ वर्षे इतके आहे, जे जगातील अन्य राष्ट्रांच्या तुलनेत कितीतरी तरुण आहे. तथापि, या लाभांशाचे मूल्य कोऱ्या धनादेशाप्रमाणे आहे. तो जर आपण वठविलाच नाही, तर त्याचा लाभ शून्य आहे. म्हणून लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ उठवून आपण या मनुष्यबळाचा योग्य विनियोग केला पाहिजे. शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन क्षेत्रांवर सर्वाधिक लक्ष्य केंद्रित करून त्यामध्ये पुरेपूर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. खाणारी तोंडे वाढत असताना काम करणारे हात त्या प्रमाणात न वाढल्यास सामाजिक अस्थैर्य निर्माण होऊन लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे रुपांतर लोकसंख्याशास्त्रीय आपत्तीमध्ये होण्याचा धोका सर्वाधिक असतो, असा इशाराही त्यांनी दिला.

डॉ. जाधव पुढे म्हणाले, आपल्या देशात १० लाख लोकसंख्येचा ‘ऑक्टोपस क्लास’ आहे, ज्याने देशातील ८० टक्के संपत्तीवर कब्जा केला आहे. जातिनिहाय पाहू गेल्यास २२ टक्के उच्चवर्णीयांकडे ४१ टक्के संपत्ती, तर २७ टक्के मागासवर्गीयांकडे अवघी ११ टक्के संपत्ती असे विषम वाटप दिसते. भारतातील शेती उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचीही सध्या अवस्था बिकट आहे. त्यांना मदतीची गरज आहे. भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढताना दिसत असली, तरी देशातून बाहेर होणारी गुंतवणूक आणि परदेशातून देशात होणारी गुंतवणूक यांचे समीकरण पाहता देशात होणारी ही गुंतवणूक जवळपास शून्य आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून धोरणकर्त्यांनी देशात सर्वसमावेशक अर्थनीती आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

विसाव्या शतकात अमेरिका, पश्चिम युरोप आणि जपान ही तीन आर्थिक वृद्धीची केंद्रे होती. आज एकविसाव्या शतकात मात्र अमेरिका हा ढासळता मनोरा असून चीन, रशिया आणि भारत ही नवी आर्थिक केंद्रे उदयास आली आहेत. भारताने यापुढील काळात अमेरिकेवर विसंबून राहून चालणार नाही, असेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

‘परमस्नेह्याच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद मोठा’डॉ. जे.एफ. पाटील हे माझे परमस्नेही होते. आम्हा मित्रमंडळींत ते ‘ज.फा.’ म्हणूनच लोकप्रिय होते. पूर्णपणे कोल्हापुरी व्यक्तीमत्त्वाचा आणि सर्वांना जीव लावणारा असा हा आमचा सन्मित्र होता. माझ्या आयुष्यातील ७५ वा पुरस्कार हा या माझ्या परमस्नेह्याच्या नावे मिळाल्याचा मला मोठा आनंद वाटतो आहे, अशी भावना यावेळी डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांनी कशी कृतज्ञता व्यक्त करावी, याचा हा पुरस्कार म्हणजे वस्तुपाठ आहे. डॉ. जे.एफ. पाटील यांचे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधकीय आणि प्रशासकीय वाटचालीमध्ये मोलाचे योगदान आहे. एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते एक उत्तम माणूसही होते. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावरील अर्थशास्त्राचा प्रभाव दाखवून देण्याची आस त्यांना कायम राहिली. म्हणूनच अत्यंत सहजसोप्या भाषेत अर्थसंकल्पाचे विश्लेषण ते अखेरपर्यंत दरवर्षी करीत राहिले. भगवान महावीर अध्यासनाची इमारत हे त्यांचे स्वप्न होते. ते आता आम्ही पूर्ण करीत आहोत. डॉ. नरेंद्र जाधव म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती, संधी शोधण्याची वृत्ती आणि त्यापायी कष्ट करण्याची प्रचंड तयारी याचे प्रतीक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’ हे आत्मचरित्र वाचलेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. जे.एफ. पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. राहुल म्होपरे यांनी मानपत्राचे वाचन केले.

कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. बी.पी. साबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे डॉ. जे.ए. जाधव, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. वासंती रासम, डॉ. संजय ठिगळे, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, डॉ. पाटील यांचे कुटुंबिय यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदिनी पाटील, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here