यावर्षी जानेवारी महिन्यात प्रचंड थंडी असूनही हजारो लोक दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यासाठी जमले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात ‘विकसित भारत 2047’चा संदेश देत, देश 2047 पर्यंत विकसित करण्याचं वचन दिलं होतं.
आकर्षक आश्वासनांसाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या मोदींचं हे सर्वात अलिकडील आश्वासन आहे.
तसं पाहता ‘विकसित भारत’ हा एक अनिश्चित संकल्प आहे. पण एका दशकापूर्वी सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अत्यंत वेगानं आर्थिक विकासाचा पाया रचल्याचा दावा गेल्या 10 वर्षांमध्ये अनेकदा केल्याचं पाहायला मिळालं आहे.
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला आधीच्या सरकारकडून वारशात नाजूक अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था मिळाली होती. विकासाचा वेग मंदावलेला होता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालेला होता. भारताचे जवळपास डझनभर अब्जाधीश दिवाळखोरीत निघाले होते आणि त्यामुळे देशातील बँकांमध्ये अब्जावधींच्या कर्जाची परतफेडच करण्यात आलेली नव्हती.
या थकीत कर्जांमुळं बँकांची इतर व्यावसायिकांना कर्ज देण्याची क्षमता प्रचंड कमी झाली होती.
आता दहा वर्षांनंतर भारताचा विकासदर इतर मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक वेगानं पुढं जात आहे.
भारताच्या बँका चांगल्या स्थितीत असून प्रचंड त्रासदायक कोरोनाच्या साथीचा सामना केल्यानंतरही भारत सरकारच्या तिजोरीची स्थिती स्थिर आहे.
गेल्यावर्षी ब्रिटनला मागे टाकत, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला.