Friday, December 12, 2025
Homeशिक्षणबातम्याभारतीय लोकशाहीसाठी आपली राज्यघटना सक्षम - नरेंद्र जाधव

भारतीय लोकशाहीसाठी आपली राज्यघटना सक्षम – नरेंद्र जाधव

आंतरराष्ट्रीय परिषदेस विद्यापीठात प्रारंभ

सोलापूर – राजकीय लोकशाहीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड दिल्यामुळेच भारतीय राज्यघटना आज 75 वर्षानंतरही सक्षम असल्याचे प्रतिपादन माजी खासदार, प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मन: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी डॉ. नरेंद्र जाधव बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, जगात दुसर्‍या महायुध्दानंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्राच्या राज्यघटनांचे आयुर्मान हे सरासरी 17 वर्षे एवढेच आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड देवून एक व्यक्ती, एक मतदान अधिकार बहाल केल्यानेच भारतीय राज्यघटना 145 कोटी लोकसंखेला बांधुन ठेवणारी व 75 वर्षानंतरही सक्षम असल्याचे दिसुन येते. नवीन भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयावर लेखन केले आहे. जातीव्यवस्थेमुळेच आर्थिक विकासाला खिळ बसते. स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि संधीची समानता जेथे नसते, तेथे आर्थिक विकास होत नाही. म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करुन दिली असल्याचेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे समानता, ज्ञान, सेवाभाव आणि प्रगती या मुलभूत तत्वावर पुढे जात असल्याचे स्पष्ट केले. राजाभाऊ सरवदे यांनी अध्यासन केंद्राबद्दल विस्तृत माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राबद्दल देखील माहिती सांगितली.

दुसर्‍या सत्रात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार’ या विषयावर डॉ. विजय खरे मांडणी केली. भारताचे परराष्ट्र धोरण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलभूत विचारावर आधारलेले आहे. त्याच विचारावर भारत आजही जगात वाटचाल करत असताना मानवतावाद डोळ्यासमोर परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करत असल्याचे नमुद केले.यावेळी 150 संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लिहलेल्या संशोधन पेपरचे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या दोन व्हॉल्युमचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एच.ए.शेख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. सागर राठोड यांनी मानले. आंतरराष्ट्रीय परिषदेला विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments