सोलापूर, – चीनचे व्यापारी वर्चस्व रोखण्यासाठी आणि जगातील सर्व देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबचे संबंध अधिक दृढ करतील आणि त्याचा फायदा जागतिक स्तरावर भारताला होईल, असे प्रतिपादन डॉ. अनंत लाभसेटवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. अनंत अॅन्ड लता लाभसेटवार चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर आणि लाभसेटवार फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानाने डोनाल्ड ट्रम्प आणि भारत – अमेरिकेचे परराष्ट्र धोरण या विषयावर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होेते. यावेळी डॉ. लाभसेटवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, लता लाभसेटवार, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. अनंत लाभसेटवार म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताशी जवळीक निर्मितीला प्राधान्य देत आहेत. चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची मोठी गरज आहे. आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात भारत महत्वाची भुमिका बजावू शकतो. ही अमेरिकेची धारणा असल्याने भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होणार आहेत. ट्रम्प हे पक्षपाती नसुन गुणवत्तेचा पुरस्कार करणारे आहेत. त्यामुळेच अमेरिकेत त्यांची लोकप्रियता वाढत आहे. अमेरिकेत अनाधिकृत प्रवेश केलेल्या नागरिकांमुळे मुलभूत सोयी-सुविधावर अधिक भार निर्माण होत असल्याने अवैध लोकांना त्यांच्या-त्यांच्या देशात परत पाठवण्याची सुरवात त्यांनी केली आहे, असेही डॉ. लाभसेटवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतीक पातळीवर सक्षमपणे नेतृत्व करत आहे. मोदी यांच्या नेतृत्वमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होऊन भारताला त्याचा विविध पातळीवर फायदा होणार असल्याचे डॉ. दामा यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौतम कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी केले. तर आभार सागर राठोड यांनी मानले.