Friday, December 12, 2025
Homeबातम्याभाऊ पाध्येंनी प्रस्थापित चौकटी झुगारून लेखन केले - प्रा . सप्रे

भाऊ पाध्येंनी प्रस्थापित चौकटी झुगारून लेखन केले – प्रा . सप्रे

कोल्हापूर, – भाऊ पाध्ये हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे अनुभववादी, मानवतावादी लेखक होते. समस्त प्रस्थापित मांडणी व संकेतांना छेद देणारे आणि प्रस्थापित चौकटी झुगारून देत जगण्याचे अराजक मांडणारे लेखन हे त्यांच्या समग्र साहित्यव्यववहाराचे वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे पी.एम.-उषा योजनेअंतर्गत साठोत्तरी काळातील अग्रगण्य लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार’ या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्रास आज प्रारंभ झाला. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना प्रा. सप्रे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ कवी, अनुवादक व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

प्रा. सप्रे यांनी आपल्या बीजभाषणात पाध्ये यांच्या समग्र साहित्याचे चिकित्सक आकलन मांडले. ते म्हणाले, भाऊ पाध्ये यांचे साहित्य समजून घेण्यास प्रचलित वादसंकल्पना अपुऱ्या ठरतात. अत्यंत चौफेर आणि खुलेपणाने, अनुभवाला थेट भिडणारे लेखन भाऊंनी केल्याने ते अनुभववादी लेखक ठरतात. त्यांनी स्वतःच्या लेखनाला कोणतीही प्रचलित संदर्भचौकट स्वीकारली नाही. रचनेपेक्षा विरचनेवर अधिक भर दिला. टोकाचा व्यक्तीवाद टाळून ते समूहाच्या दृष्टीने भोवतालाकडे पाहतात. कृतीप्राधान्यतेबरोबरच आदिम प्रेरणांचे मुक्त आविष्कार त्यांच्या लेखनात आढळतात. आशय, भाषा, विषय यांची असांकेतिकतेसह अनुत्कट शैली असली तरी त्यात कोरडेपणा नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वर्गीय जाणीवा समजून घेतानाच त्यापलिकडे जाऊन एका विशिष्ट तटस्थ बिंदूवरुन ते त्याविषयीचे लेखन करतात. त्या अर्थाने ते अवर्गीय आणि व्यापक अंगाने मानवतावादी लेखक ठरतात. त्यांच्या लेखनात कोणताही पूर्वग्रह आढळत नाही. मानवी समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व विसंगतींसह निर्माण झालेल्या अनेक आवाजांचे मिश्रण त्यांच्या साहित्यात आढळते म्हणून ते वेगळे आणि श्रेष्ठ ठरते. ते समजून घेण्यासाठी भाऊंच्या समग्र साहित्याचे पुनर्वाचन आवश्यक ठरते, असेही सप्रे म्हणाले.

वाचकांची अभिरुची घडविणारा पत्रकार, लेखक

चंद्रकांत पाटील यांनी भाऊ पाध्ये यांच्या सहवासातील अनेक मैत्रीपूर्ण प्रसंगांना उजाळा देऊन त्यामधून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक अलक्षित पैलू श्रोत्यांसमोर मांडले. ते म्हणाले, लघुनियतकालिक चळवळीला बळ देणारा प्रणेता भाऊ पाध्ये होते. कामगार चळवळीत त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. त्यामुळे येथील अधोसंस्कृतीकडे पाहण्याची त्यांची म्हणून एक वेगळी दृष्टी होती. ती दृष्टी पुढे मनोहर ओक, नामदेव ढसाळ यांच्यात आढळते. सिनेमापासून राजकारणापर्यंत विविध विषय त्यांनी पत्रकार, लेखक म्हणून हाताळले. त्याद्वारे सिनेमाविषयी जाणीवा निर्माण करीत असतानाच वाचकांची उच्च अभिरुची त्यांनी घडविली. नवे लेखक त्यांच्या लेखनापासून, शैलीपासून प्रेरणा घेत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, भाऊ पाध्ये यांनी उघड्या डोळ्यांनी, संवेदनशील मनाने भोवताल टिपला आणि तो जसाच्या तसा लिहीला, म्हणून ते लेखन वाचकांना भिडले. त्यांच्या साहित्यात माणसाचे खरे दर्शन घडते, त्याचा विद्यार्थ्यांनी मुळापासून अभ्यास केला पाहिजे.

मान्यवरांच्या हस्ते भाऊ पाध्ये यांच्या ‘राडा’ या गोरख थोरात अनुवादित हिंदी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी थोरात यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल प्रा. सप्रे यांचा आणि उत्कृष्ट शोधप्रबंध पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. समारंभास डॉ. माया पंडित, डॉ. उदय नारकर, डॉ. श्रीराम पवार, सचिन परब, डॉ. शरद नावरे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. किरण गुरव, अमित नारकर, अवधूत डोंगरे, प्रसाद कुमठेकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments