संसद भवन परिसरात पत्रकारांनी घडविले एकीचे दर्शन
नवी दिल्ली – संसद भवन परिसरात एक वेगळे चित्र सोमवारी, 29 जुलै रोजी पाहायला मिळाले . या दिवशी दिवसभरात एकाही पक्षाच्या मंत्री, खासदारांची बाईट पत्रकारांनी घेतली नाही .
पत्रकारांच्या या पवित्र्यामुळे सर्व पक्षांचे खासदारही अस्वस्थ होते . सर्व पत्रकार संसद भवनाच्या परिसरात असूनही कोणत्याच मंत्री किंवा खासदाराला भेटतही नाहीत असा प्रकार नव्या संसद भवनाच्या वास्तूमध्ये प्रथमच घडला .
पत्रकारांच्या नाराजीमुळे हे घडल्याचे लक्षात आल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी पत्रकारांना हवा तसा निर्णय घेऊन ही नाराजी दूर केली .
मकर द्वार परिसरात वार्तांकन करण्यास पत्रकारांना मनाई केल्याने हे सारे घडल्याचे सांगण्यात आले .या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की, संसद भवनात संसदेचे कामकाज संपल्यानंतर पत्रकार विविध पक्षांच्या खासदारांना मकरद्वार परिसरात भेटत असतात . संसदेच्या दिवसभराच्या कामकाजाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया (बाईट) पत्रकार नोंदवत असतात . संसदेत जाण्याचा किंवा परतण्याचा मकरद्वार हा मुख्य मार्ग आहे . त्यामुळे या ठिकाणी विविध पक्षांच्या मंत्री,खासदारांना भेटणे पत्रकारांसाठी सोईचे आहे .
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे माध्यम प्रतिनिधी अचंबित झाले . माध्यम प्रतिनिधींसाठी जो कक्ष उभारण्यात आलेला आहे, तो एका बाजूला आहे व तिथे पुरेशी जागा नाही . तेथे जर खासदारांना बोलावले तर वाहतूक कोंडी होते .त्यामुळे खासदारांना तेथे बोलावून बाईट घेणे पत्रकारांना शक्य होत नाही . मकरद्वार परिसरात पत्रकारांना सोडून नका असे आदेश आम्हाला वरून आले आहेत असे सुरक्षा रक्षकांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले .
या प्रकारामुळे संतापलेल्या माध्यम प्रतिनिधींनी एकत्रितपणे निर्णय घेतला की, आज कोणत्याही पक्षाच्या खासदाराची बाईट घ्यायची नाही .नेहमी सरकारच्या बाजूने असणारे पत्रकारही यात सहभागी झाले . त्यामुळे दिवसभरात एकाही पत्रकाराने कोणत्याही पक्षाच्या मंत्र्याची, खासदाराची बाईट घेतली नाही .हा प्रकार जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना समजला तेव्हा त्यांनी संसदेत मत मांडले . पत्रकारांना अस कोंडून ठेऊ नका अशी मागणी त्यांनी केली इतर खासदारांनाही हीच भूमिका मांडली .
29 जुलै 2024 रोजी पत्रकार नेहमीप्रमाणे खासदारांचा बाईट घेण्यासाठी मकरद्वार परिसरात जाऊ लागले . तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवून तुमच्या कक्षातच थांबा असे सांगितले . माध्यमाच्या प्रतिनिधींसाठी संसद भवन परिसरात एक काचेचा माध्यम कक्ष उभारला आहे . तेथेच तुम्ही थांबा असे पत्रकारांना सांगितले गेले . जुन्या संसद भवनाच्या परिसरातही पत्रकारांना फिरण्यास मनाई करण्यात आलीपत्रकारांना ज्यांचे बाईट घ्यायचे असतील त्यांना त्या कक्षात बोलावून बाईट घ्यावेत असे सांगण्यात आले .
अखेरीस सभापती ओम बिर्ला यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळास बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या .त्यानंतर सभापती बिर्ला यांनी मान्य केले की पत्रकारांना नेहमीप्रमाणे खासदारांचे बाईट घेण्याची परवानगी दिली जाईल . पत्रकारांना मकर गेट परिसरामध्ये प्रवेश दिला जाईल . तसेच पत्रकारांना संसद भवनात प्रवेश करताना व बाहेर पडताना अडचणी येणार नाहीत अशा उपाय योजना करू .
कोविड काळानंतर पत्रकारांना संसद भवनातील वार्तांकनासाठी पूर्वीप्रमाणे पासेस दिले जात नाहीत, ही प्रथा अजूनही सुरु आहे . काही ठराविक पत्रकारांना संसद भवन प्रवेश दिला जातो , या संदर्भातही सभापती बिर्ला यांनी सांगितले की, पात्र असलेल्या सर्व पत्रकारांना संसद भवनातील वार्तांकन करण्यासाठी कायमस्वरूपी पास देण्याची प्रथा पुन्हा सुरू करू .
संसद भवनात वार्तांकन करण्यासाठी जो अडथळा निर्माण झाला होता, तो पत्रकारांच्या एकीमुळे तो आता दूर झाला आहे . .