कोल्हापूर – ऑक्टोबर: महात्मा गांधी यांचा अहिंसा हा मानवजातीच्या दृष्टीने सर्वात मोठा धर्म असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांची जयंती व विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘लोकशाही आणि अहिंसा’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मानवजातीने त्याचा स्वीकार केला पाहिजे. अहिंसेची परंपरा महात्मा गांधी यांनी पुढे नेलेली आहे. हिंसा हा मानवजातीच्या विकासातील अडथळा तर क्षमा हा श्रेष्ठतम गुण आहे. गांधी लोकशाहीचे मोठे पुरस्कर्ते होते. सत्ताबदल अहिंसेच्या मार्गाने होऊ शकतो. महात्मा गांधी यांना विकेंद्रित लोकशाही अभिप्रेत होती. त्यांच्या मते भारत गणराज्य असल्याने त्यात अधिकाराची उतरंड नसावी. सर्व निर्णय एकमताने घेतले पाहिजेत. ग्रामपंचायतीपेक्षा ग्रामसभेला गांधी महत्त्व देतात. त्यांना अपेक्षित लोकशाहीच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे.
यावेळी डॉ.सचिन भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुशांत माने यांनी परिचय करून दिला. डॉ. नितीन रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सूर्यकांत गायकवाड यांनी आभार मानले.फोटोओळ- डॉ. अशोक चौसाळकर यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करताना व्ही.बी. शिंदे. सोबत डॉ. सूर्यकांत बंडगर, डॉ. सचिन भोसले, डॉ. नितीन रणदिवे आणि डॉ. मुफीद मुजावर.