महाराष्ट्राआधी स्मारक उभारणीत आंध्र, तेलंगणाची बाजी
मुंबई – मुंबईत इंदू मिलच्या जागेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक स्मारक उभारणीचा निर्णय 2013 साली झाला तेव्हा 2018 पर्यंत स्मारक उभारले जाईल असे सांगण्यात आले होते. स्मारकाचे काम पूर्ण होण्यास 2027 साल उजाडणार असे आता सांगितले जात आहे. आंध्र आणि तेलंगणा राज्यांनी निर्णय घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य स्मारके उभारण्यात माहराष्ट्राआधी बाजी मारली आहे. .
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महाराष्ट्रात उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. चैत्यभूमी ही आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्वाची जागा आहे. त्यासमोर असलेल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं मोठं स्मारक उभारले जात आहे.
मुख्य वैशिष्ट्येः उंच पुतळाः डॉ. आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा (450 फूट) हे स्मारकाचे मुख्य वैशिष्ट्य असेल. |
मेडिटेशन हॉल :डॉ. आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित चिंतन आणि ध्यानाची जागा |
सांस्कृतिक संग्रहालयः आंबेडकरांचे जीवन, कार्य आणि व्यापक दलित चळवळीचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित. |
उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणेः अभ्यागतांना एकत्र येण्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी भूदृश्य क्षेत्रे. |
यातील काही टप्प्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
5 डिसेंबर 2012- लोकसभेत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देत असल्याचं जाहीर करण्यात आले.
19 मार्च 2013 -मुंबईतील दादर येथील इंदू मिल कंपाऊंडमध्ये सुमारे 12.5 एकर जमीन स्मारक बांधण्यासाठी भारत सरकारने अधिकृतपणे दिली होती. तेथून खऱ्या अर्थाने या स्मारकाच्या उभारण्याला चालना मिळालेली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एम.एम.आर.डी.ए.) ची विशेष प्राधिकरण म्हणून या स्मारक उभारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.
20 एप्र2ल 2013 – स्मारक विकासासाठी एम.एम.आर.डी.ए. ची जबाबदारी निस्चित करण्यात आली.
11 ऑक्टोबर 2015 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमामुळे या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली.
2016– स्मारकाची स्थापत्य रचना, ज्यात डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि विशाल संग्रहालय संकुलाचा समावेश आहे, ती स्पर्धात्मक निवड प्रक्रियेनंतर अंतिम करण्यात आली.
25 मार्च 2017– स्मारकासाठीच्या जागेची मालकी व्स्त्रोद्योग महामंडळाकडे होती ती मालकी एम.एम.आर.डी.ए. कडे हस्तांतरीत केली.
2018 – स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात. प्रतिष्ठित पुतळा आणि सहाय्यक पायाभूत सुविधांसह स्मारकाचे बांधकाम सुरू झाले.
15 जानेवारी 2020 – डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 350 ऐवजी 450 फूट करण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय.
6 डिसेंबर 2021-डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवसाच्या स्मरणार्थ स्मारकाचा एक भाग जनतेसाठी खुला करण्यात आला.
14 एप्रिल 2023 – मार्च 2024 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल असा शासन नियुक्त त्रिसदस्यीय समितीचा निर्वाळा.
6 डिसेंबर 2024 -लँडस्केपिंग आणि संग्रहालयाच्या आतील भागासह स्मारकाच्या बांधकामाचे अंतिम टप्पे सुरू आहेत. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.स्मारक उभारणीचा खर्च तिपटीने वाढून 1ा00 कोटी झाला आहे.
महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पूर्नत्वाचे काम लांबणीवर पडत आहे. आंध्र प्रदेश राज्याने विजयवाडा येथे तर तेलंगणा राज्याने हैदराबाद येथे डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकांची उभारणीकरण्यात बाजी मारली आहे.
विजयवाडा येथील स्मारक पूर्ण
विजयवाडा येथील पुतळा
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. भारतीय समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाचे शिक्षण, प्रेरणा आणि स्मरण केंद्र म्हणून याला महत्त्वपूर्ण महत्त्व आहे. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2016 रोजी आंबेडकर स्मारकाची पायाभरणी करण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या 125 फूट कांस्य पुतळ्याची स्थापना, जी भारतातील अशा प्रकारच्या सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे. याचे उद्घाटन आंबेडकर जयंतीच्या वेळी 14 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले. 125 फूट उंचीचा हा पुतळा, ज्यावर तो उभा आहे त्या 85 फूट पायथ्याचा समावेश केल्यावर प्रत्यक्षात 206 फूट उंच आहे, पायथ्याशिवाय 125 फूट उंची गाठतो. स्वराज मैदानावर अनुभव केंद्र, 2000 आसनक्षमतेचे अधिवेशन केंद्र, फूड कोर्ट, मुलांचे खेळाचे मैदान, जलसाठे, संगीताचे कारंजे आणि पदपथ यासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
हैदराबाद येथे डॉ. आंबेडकर स्मारकाची उभारणी
हैदराबाद येथील पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उभारण्यात आले आहे, आंबेडकरांचा हा 125 फूट उंचीचा पुतळा सामाजिक न्याय आणि समानतेच्या पुरस्काराचा एक मोठा पुरावा आहे. 14 एप्रिल 2023 रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. या पुतळ्याची रचना प्रसिद्ध शिल्पकार राम वनजी सुतार आणि अनिल राम सुतार यांनी केली आहे. भारतीय संसदेसारख्याच संरचनेवर पुतळा ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे संपूर्ण उंची 175 फूट झाली आहे. 11.4 एकरांवर पसरलेल्या हुसेनसागर तलावाच्या किनाऱ्याजवळ पुतळा उभारण्यात आला आहे. 20, 000 चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या वर्तुळाकार संरचनेत एक संग्रहालय, एक ग्रंथालय आणि 100 आसनक्षमतेचे दृकश्राव्य सभागृह असेल. या संग्रहालयात बाबासाहेबांच्या जीवनातील विविध लेख आणि छायाचित्रे प्रदर्शित केली जातील आणि प्रेक्षकांसाठी नाट्यगृहात एक लघुपट सादर केला जाईल.