छप के बिकते थे
जो कल तक अखबार
सुना है इन दिनो
वो बिक के छपा करते है
या चार ओळी भारतातील वृतपत्रांची आणि एकंदरच माध्यमांची सद्यस्थिती स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत . ही स्थिती का निर्माण झाली याची अनेक कारणे आहेत. दोन प्रमुख कारण आहेत जागतिकीकरण आणि माध्यमांचे परावलंबित्व . जागतिकीकरणामुळे जगाची बाजारपेठ खुली झाली. या कालखंडात भारतात माध्यम क्षेत्रामध्ये मोठे बदल झाले . बहुराष्ट्रीय टी.व्ही . चॅनल्सची संख्या झपाट्याने वाढत गेली. वृतपत्रांची आपसात आणि टीव्हीशी स्पर्धा सुरु झाली .वृत्तपत्र मालकांनी प्रगत देशातून महागडी यंत्रसामुग्री, वृत्तकागद, शाई इत्यादी साहित्य मागविण्यास सुरुवात केली.अधिक पानांचे आणि रंगीत वृतपत्र कमीत कमी किमतीमध्ये वाचकाला देण्याची स्पर्धा सुरू झाली . एखादे वृतपत्र अथवा टीव्ही चॅनल काढायचे तर किमान 200 कोटी जवळ हवेत . पंधरा रुपयाचे वृतपत्र अवघ्या एक ते पाच रुपयाला विकले जाते तसेच बातम्यांसाठी दर्शकांकडून नाममात्र रक्कम घेऊन चालणारी टीव्ही चॅनल्स प्रचंड तोट्यात असतात .जाहिरातीतून हा तोटा भरून काढावा लागतो. या जाहिरातींसाठी सत्ताधारी आणि बडया भांडवलदारांवर माध्यमांचे अवलंबित्व आहे . त्यामुळे वाट्टेल त्या तडजोडी ही माध्यमे स्वीकारतात .
वृतपत्र क्षेत्रात काही भांडवलदारांची एकाधिकारशाही सुरु झाली . टीव्ही चॅनल्सही त्यांनीच ताब्यात घेतली आणि ते माध्यम सम्राट बनले .ज्या संपादक आणि पत्रकारांना स्वतः चे ठाम विचार आहेत आणि ज्यांची जनतेशी बांधिलकी आहे, त्यांना या माध्यम सम्राटांनी घरचा रस्ता दाखविला .माध्यम सम्राटांनी केलेल्या कोंडीमुळे स्थानिक भाषा आणि संस्कृती जपणारी छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत येऊन बंद पडली .आम्ही वृतपत्र , टीव्ही चॅनल समाजसेवेसाठी अथवा सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास चालवित नाही, तर नफा मिळविल्यास चालवितो अशी भूमिका माध्यम सम्राटांनी घेतली. कणाहीन पत्रकार आणि संपादक या माध्यम सम्राटांनी नोकरीस ठेवले.जनतेचे प्रबोधन आणि लोकशिक्षण ही भूमिका सर्वस्वी सोडून देण्यात आली.
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून समाज माध्यमे सर्वांच्या हाती आली. ही समाज माध्यमे सर्वसामान्यांचा आवाज बनतील असे वाटत होते . कारण या समाज माध्यमांची गती आणि पोहोच खूप आहे. कुठलेही प्रशिक्षण नसताना सर्वसामान्य माणसाच्या हाती फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्टिटर इत्यादी समाजमाध्यमे आली. ही सर्व लोकप्रिय समाज माध्यमे अमेरिकेतील माध्यम सम्राटांच्या मालकीची आहेत. त्यांना केवळ पैसा हवा आहे. स्मार्ट फोनच्या मदतीने भारतीयांच्या हाती आलेल्या या समाज माध्यमांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. आपले फोटो आणि रिल्स समाज माध्यमांवर टाकून धन्यता मानन्यात लोक गुंग आहेत. ही न उतरणारी नशा आहे . त्यामुळे सर्वसामान्यांना ही समाज माध्यमे जीव की प्राण वाटत असली तरी या समाज माध्यमांनी भारतीयांची गोपनीय माहिती वेळोवेळी इतरांना विकून त्यांना फसविले आहे. या समाज माध्यमांद्वारे पसरविल्या जाणाऱ्या द्वेषमूलक व खोट्या बातम्या ही मोठी डोकेदुखी बनली आहे. समाज माध्यमांमुळे सायबर गुन्हेगारी खूपच वाढली आहे , त्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे. या समाज माध्यमांचे मालक परदेशात असल्याने त्या द्वारे होणाऱ्या फसवणुकीस संरक्षण देण्यास आपले कायदे अपुरे आहे. अनेकांना समाज माध्यमांचे व्यसन जडले आहे. परिणामी सामान्य भारतीय माणूस पदोपदी बळी पडतो आहे .
एकंदरीत वृतपत्रे, टीव्ही आणि समाज माध्यमे जनतेला योग्य दिशा दाखविणे सोडून केवळ रंजन, रंजन आणि रंजनाचा भडीमार करीत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस वृत्तीने चंचल बनला आहे . कोणत्याही गंभीर विषयासंबंधीचे, समाज प्रबोधनाविषयीचे लेखन अथवा चर्चा त्याला आता नकोशी झाली आहे. लोक स्वतंत्र विचार न करता माध्यमांवर विसंबून राहतात याचा फायदा घेऊन माध्यम सम्राट लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजविण्याचा प्रयत्न करीत आहेत . लोकांच्या नकळत त्यांना महागड्या, गरज नसलेल्या वस्तू अत्यावश्यक असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. लोकांच्या नकळत त्यांचे राजकीय, सामाजिक विचार ठराविक दिशेला वळविले जात आहेत . यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर माध्यम सम्राट करीत आहेत.माध्यमांनी खरे तर विरोधी पक्षाची भूमिका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायला हवेत, मात्र सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून देशी आणि विदेशी माध्यम सम्राट निश्चिंत झाले आहेत . आम्ही सांगू तेच खरे अशी भूमिका घेऊन हे माध्यम सम्राट सर्वसामान्य माणसाला माहितीरंजनाच्या मायाजालात गुंगवून टाकत आहेत. खरे काय ते सामान्य माणसाला शेवटपर्यंत कळू नये आणि त्याने खरे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये अशी व्यवस्था या माध्यम सम्राटांनी निर्माण केली आहे.
जी माध्यमे खोट्या बातम्या पसरविण्यास कारणीभूत आहेत तीच माध्यमे फेक न्यूज कशा ओळखाव्या याचे प्रशिक्षण देतात हा मोठा विरोधाभास त्यामुळे अनुभवाला येतो आहे .
भारत हा जगातील मोठा लोकशाही देश आहे. ही लोकशाही प्रगल्भ आणि सदृढ होण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. मात्र ही माध्यमेच आपले स्वत्व गमावून बसलेली असतील तर लोकशाहीलाही धोका निर्माण होतो . दारिद्रय, बेरोजगारी, आरोग्य, शेतमालाचे भाव, दुष्काळ यासारखे लोकांचे खरे प्रश्न बाजूला ठेवून खोट्या भावनिक प्रश्नात लोकांना गुंतवून ठेवण्याचे काम सत्ताधारी आणि माध्यमे करीत आहेत .
अशातच भारतातील 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी बनवली आहे. या इंडिया आघाडीने भारतातील 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार घातला आहे. हे टीव्ही अँकर सत्य न सांगता द्वेषाचा बाजार भरवतात असा आरोप त्यांनी केला आहे . ज्यांच्यावर बहिष्कार घातला त्यात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ,भारत 24 च्या अँकर रुबिका लियाकत,; इंडिया टुडे-आज तक नेटवर्कचे सुधीर चौधरी, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत आणि शिव आरूर, टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नाविका कुमार, टाइम्स नाऊ चे अँकर सुशांत सिन्हा; अमन चोप्रा, अमिश देवगण आणि सीएनएन न्यूज 18 चे आनंद नरसिंहन, इंडिया टीव्हीच्या प्राची पाराशर; भारत एक्सप्रेसच्या अदिती त्यागी; आणि डीडी न्यूजचे अँकर अशोक श्रीवास्तव यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात प्रथमच असे घडताना दिसत आहे .पत्रकारांनी केवळ सत्ताधारी पक्षाचे लांगूलचालन करणे जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच विरोधी पक्षांनीही काही अँकर्सवर बहिष्कार टाकणे निषेधार्ह आहे. याच देशात राजा राम मोहन रॉय,महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या बाणेदार पत्रकारांनी निर्माण केलेली परंपरा कोठे गेली असा प्रश्न पडतो. अजूनही माध्यमे आपणाला वर्ष, तारीख आणि दिवस बरोबर सांगतात हेच उपकार आहेत असे वाटावे असा हा काळ आहे.
- डॉ. रविंद्र चिंचोलकर
( मो . 9860091855 )