भिंतीला कान असतात हे सारे सांगत असतात , पण भिंतीला मोठे मन असते हे आज पर्यंत कधी ऐकले का? पण भिंतीलाही मोठे मन असू शकते हे सिद्ध झाले आहे .
सगळीकडेच सध्या पैशाचा बोलबाला आहे . कमी कष्टात जास्तीतजास्त पैसा कमावण्यामागे सारे लागलेले असतात . त्यात क्रिकेट हा तर केवळ पैशाचा खेळ बनला आहे . भारत जगातली तिसरी अर्थसत्ता होईल तेव्हा होईल मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड ( बीसीसीआय) जगातील सर्वात श्रीमंत असलेले क्रिकेट बोर्ड बनले आहे . या क्रिकेट बोर्डाकडे सध्या 18 हजार 700 कोटी रुपये संपत्ती आहे . आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डापेक्षा भारतीय क्रिकेट बोर्ड श्रीमंत आहे . त्यामुळे ज्यांचा खेळाशी आणि क्रिकेटशी काहीही संबंध नाही असे लोकही बीसीसीआय आपल्या ताब्यात ठेवत असतात .
कधी काळी क्रिकेटला जंटलमेन्स गेम (सज्जनांचा खेळ ) असे म्हटले जात होते . मात्र आता क्रिकेट जंटलमेन्स गेम राहिलेला नाही . आता हा केवळ पैशाचा खेळ बनला आहे . मात्र या क्रिकेटमध्ये एक जंटलमेन अजूनही आहे तो म्हणजे राहुल द्रविड.
टी-20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला तेव्हा बीसीसीआय ने या क्रिकेट संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले , तेव्हा या पैशाचे वाटप कसे होणार ? हा प्रश्न सर्वांना पडला होता . जेव्हा या पैशाच्या वाटपाचा तपशील जाहीर झाला तेव्हा न खेळलेल्या राखीव खेळाडूंना देखील प्रत्येकी एक-एक कोटी रुपये देण्यात आले . खरी उत्सुकता होती कर्णधाराला आणि मुख्य प्रशिक्षकाला किती पैसे जाणार याची . कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी पाच कोटी दिले असल्याचे बीसीसीआय ने जाहीर केले .
हे जाहीर झाल्यावर राहुल द्रविड यांनी जी कृती केली त्याने सर्वांची मने जिंकून घेतली. राहुल द्रविड क्रिकेट खेळताना ज्या पद्धतीने एक बाजू लढवून ठेवायचे त्यामुळे त्यांना द वॉल (भिंत) म्हणून ओळख मिळाली . 2024चा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकल्यानंतर बीसीसीआय ने त्यांना पाच कोटी रुपयांचे बक्षीस देऊ केले . त्यावेळी राहुल द्रविड यांनी नम्रपणे सांगितले की इतर प्रशिक्षकांना जेवढी रक्कम दिली जातेय तेवढीच म्हणजे अडीच कोटी इतकीच रक्कम मी घेईन . अडीच कोटी रुपये नाकारणे यासाठी मोठे मन लागतेच, मात्र माझ्या सहकाऱ्यांपेक्षा जास्तीचा एक रूपयाही मला नको हा समानतेचा संदेश देणाऱ्या द्रविडचे मन आभाळा एवढे मोठे आहे असे म्हणावे लागेल . टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी राहुल द्रविड यांच्या व्यतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस म्हांम्ब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड यांची नेमणूक करण्यात आली होती .
राहुल द्रविड यांच्या मोठया मनाचे दर्शन घडले असे प्रसंग अनेक आहेत . जेव्हा भारताच्या ज्युनिअर संघाकडून पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा पराभव झाला, तेव्हा पाकिस्तानी संघाच्या कक्षात जाऊन खेळाडूंना धीर देण्याचे काम द्रविड यांनी केले .त्याचप्रमाणे नवख्या नेपाळ संघाकडून भारतीय क्रिकेट संघ हरला तेव्हा नेपाळी खेळाडूंना शाबासकी देऊन त्यांचे धैर्य वाढविण्याचे कामही द्रविड यांनी केले आहे .
क्रिकेट मधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर अनेक क्रिकेटपटूनी खूप पैसा कमावण्याचे मार्ग धुंडाळले. राहुल द्रविड यांनी मात्र नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु केले . 2007 साली राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप जिंकू शकता नव्हता . मात्र प्रशिक्षक म्हणून कार्य करताना त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले . आयपीएल 2024 मध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूची मने एकमेकांविषयी कलुषित झालेली होती .विराट कोहली आणि हार्दिक पंडया यांनी विश्वचषकाच्या कालखंडात गमावलेता फॉर्म चिंताजनक होता . अशा स्थितीत राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना एका सूत्रात बांधण्याचे कार्य केले . सर्व खेळाडूंमध्ये संघभावना वाढविली .त्यामुळे 2024 च्या विश्वचषकात एकही सामना भारतीय संघाने गमावलेला नाही .या विश्वचषकांच्या सामन्यात कोणी एक खेळाडू हिरो नव्हता, प्रत्येक सामना संघभावनेमुळे जिंकता आला .
वैयक्तिक जीवनातही राहुल द्रविड यांची वागणूक साधेपणाची व सच्चेपणाची असते . कुटुंबियांसह कोठेही गेल्यावर सिनेमा असो प्रदर्शन ते रांगेत उभे राहून तिकिटे घेतात . साध्या कपड्यात विमानातून इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात . अशाच एका प्रवासात काही प्रवाशांनी त्यांना ओळखले व ते ऑटोग्राफ मागू लागले .तेव्हा राहुल द्रविड त्यांना म्हणाले अजून अनेक लोक येत आहेत .आपण जाण्या -येण्याच्या मार्गात उभे राहिलो तर इतर प्रवाशांना त्रास होईल त्यापेक्षा आपण मोकळ्या जागेत जाऊ तिथे मी सही करीन . आधी इतरांचा विचार करणात हा माणूस फार दिलदार आणि कर्तव्यनिष्ठ माणूस आहे .
मोठ्या मनाच्या भिंतीने असे पहिल्यांदाच केलेले नाही यापूर्वीही 2018 साली भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांना 50 लाखाचे बक्षिस जाहीर करण्यात आले . तेव्हाही मोठ्या मनाच्या या भिंतीने सांगितले इतर प्रशिक्षकांना प्रत्येकी 20 लाख दिले जातात तेवढेच मलाही दया, जास्तीचे पैसे मला नकोत . त्यानंतर क्रिकेट बोर्डाने प्रत्येक प्रशिक्षकाला 25 लाख रुपये दिले .
राहुल द्रविड यांच्याकडे स्वयपांकी म्हणून दोन वर्ष काम केलेल्या मनोज यांनी आठवण सांगितली आहे की, जेव्हा जेव्हा मनोजला क्रिकेट मॅचची तिकिटे हवी होती, तेव्हा प्रत्येक वेळी द्रविड यांनी त्यांना चार – चार तिकिटे दिली . एवढेच नव्हे तर मनोज रहात असलेल्या छोट्या गल्लीत गणेशोत्सव काळात गणपती बसविला होता . तेव्हा मनोज यांनी राहुल द्रविड यांना आरतीसाठी येण्याची विनंती केली . राहुन द्रविड आनंदाने त्यासाठी उपस्थित राहिले .