अर्थतज्ञ , पत्रकार यमाजी मालकर सध्या जर्मनी देशाच्या भेटीस गेले आहेत. जर्मनीतील समाजजीवन, वातावरण, अर्थकारण कसे आहे याबाबत त्यांनी फेसबुकवर विचार मांडले आहेत, ते त्यांच्या फेसबुक भिंतीवरुन साभार घेतले आहेत.
20 मे 2024 रोजी जर्मनीच्या फ्रँकफर्टच्या विमानतळावर उतरताना या देशातील दाट वस्ती आणि भरून वाहणाऱ्या नद्या पाहायला मिळतात. जर्मनीतही पश्चिम भाग अधिक लोकवस्तीचा तसेच अधिक समृद्ध आहे.
युरोप मधील सर्वाधिक लॉकसंख्येचा (8.15 कोटी) आणि आर्थिकदृष्टया सर्वात मजबूत असलेल्या जर्मनीत अनेक बदल होताना दिसत आहेत. युद्धानंतर वाढलेली महागाई आणि विकासदर कमी होत असल्याने रियल इस्टेट क्षेत्राला बसलेला फटका यातून जर्मनी बाहेर पडतो की त्याचे काही परिणाम होतात, हे काळच ठरवील, त्याविषयी नंतर पाहूच.
अर्थात, एखादा देश किंवा त्याचे एखादे शहर आपण पाहतो आणि त्या संबंधीची निरीक्षणे नोंदवितो, तेव्हा आपण आपल्या छोट्याशा खिडकीतून काही क्षणच ती पाहात असतो, याची जाणीव ठेवूनच ही निरीक्षणे नोंदवणार आहे.
तेथे भारत उष्णतेने पोळून निघाला आहे आणि निवडणुकीचा गदारोळ अजून सुरूच आहे. येथे जर्मनीत वसंत सुरू झाला असला तरी ऊन पडेलच, याचा भरवसा नाही. थंडी तर आहेच. अगदी थंडीत हे लोक काय करत असतील, हे त्यांचे त्यांनाच माहीत! आम्ही राहतो त्या पश्चिम फ्रँकफर्टच्या गल्लीतील शांतता भारतीय मनाला झेपणारी नाही. थंडी पावसापासून संरक्षण देणारे लांबडे कोट आणि छत्री येथील माणसांचे मित्र का आहेत, हे लक्षात येते आहे. हवामानाच्या अंदाजानुसार सर्व काही घडते, असे म्हंटले जात असले तरी गेल्या आठ दिवसातील आमचा अनुभव मात्र तसा नाही. अर्थात, हवामानाच्या अचूक अनुमानासाठीच्या या धडपडीला दाद दिली पाहिजे.
युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीच्या लोकसंख्येची घनता साधारण आपल्या निम्मी (233) आहे. आपण जर्मनीच्या जीडीपीशी एक देश म्हणून स्पर्धा करत असलो तरी आपल्या लोकसंख्येमुळे त्या परिमाणाला तसा काही अर्थ नाही. फ्रँकफर्टच्या सिटी सेंटर मधील एक कॉफी शॉपमध्ये एक तास बसलो असताना पैसे मागणारे चार जण येऊन गेले आणि परतताना एका मैदानात एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचे पाहायला मिळाले. पण हे काही जर्मनीचे प्रतिनिधित्व करणारे चित्र नव्हे. 8 कोटी लोकसंख्येत असे काही नागरिक असणारच. जर्मनीची समृद्धी सर्वत्र पाहायला मिळते. तिची अर्थव्यवस्था ज्यावर मजबूत झाली आहे, त्या जगभर आकर्षण असलेल्या मोटारी, दिमाखदार, मजबूत, वेगवान रेल्वे, सुंदर बंगले, हौशी सायकली, टोलेजंग कार्यालये, विस्तीर्ण आणि स्वच्छ रस्ते, हिरवीगार शेते, जागोजागी चमकणारे सोलर पॅनल, मोठमोठे कारखाने आणि जीवनावश्यक वस्तूंनी खचाखच भरलेली दुकाने .. असे बरेच काही…
रस्ते, दुकाने, हॉटेल, रेल्वे अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी अशी कोठेच दिसत नाही. ही सर्व ठिकाणे सतत माणसांची वाट पाहात आहेत, असे वाटते. कदाचित त्यामुळेच जर्मनी निर्वासितांना अधूनमधून प्रवेश देत असावा. अर्थात , भारतीय गर्दीशी तुलना करून जर्मनीसारख्या देशात गर्दी शोधणे, हे काही बरोबर नाही म्हणा!
जर्मनी हा भांडवलशाही देश असला तरी सार्वजनिक सेवा सुविधेत त्याने कोठे कमी ठेवलेली नाही. मोफत शिक्षण आणि सार्वजनिक संस्थांना देण्यात येणाऱ्या निधीवरून ते स्पष्ट होते. अलीकडील काळात जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, असे सांगितले जाते, पण भारतीय माणसाला जर्मनी पाहत असताना ते पटण्याची अजिबात शक्यता नाही. पण ते खरे आहे. इतर देशांतील विद्यार्थ्यांना देऊ केलेल्या सवलती ते कमी करत आहेत आणि येथील रियल इस्टेटला असलेली मागणी मंदावल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. पण त्याचा आणि आपला संबंध जोडणे अवघड आहे, म्हणूनच भारतातून जर्मनीला शिक्षणासाठी येणाऱ्यांची रांग लागली आहे. इतके भारतीय जर्मनी भेटीला येत आहेत की जर्मनी व्हिसा ची प्रक्रिया जाम झाल्याने खूपच संथ वाटते. पण जर्मनीला त्याच्याशी काही देणेघेणे नाही!
जर्मनीत भटकी कुत्री नसली तरी कुत्र्यांचे दर्शन कोठेही चुकत नाही, अगदी ट्राम, बस, रेल्वेत सर्वत्र कुत्री हातात घेऊन चाललेली माणसे दिसतात. जर्मन माणूस बोलण्यास फारसा उत्सुक नाही. माणसांशी बोलायचे तर गुटन मॉगन म्हणजे गुड मॉर्निंग आणि डांकेशू म्हणजे थँक्स, येथेच त्याचा माणसाशी संवाद संपतो. संवादाची भूक ते कुत्र्याशी बोलून भागवित असावेत! मोठा आवाज झाला की तो दचकतो. अपवाद एकच, तो म्हणजे मोठा आवाज करणाऱ्या अँबुलन्स. त्याच तेवढ्या शांततेचा सतत भंग करून शहरात मानवी अस्तीत्व असल्याचे दाखवून देतात!
त्या अँबुलन्स बहुतेक वेळा एकटे राहणाऱ्या आजी आजोबांना हॉस्पिटलमध्ये नेत असाव्यात. जर्मनीची कुटुंब व्यवस्था त्यातल्या त्यात बरी, असे मानले जात असले तरी ती मुलाबाळांशी जोडलेली राहिलेली नाही. फ्रँकफर्टच्या कॉफी शॉप मध्ये वयस्कर माणसांचे अड्डे आणि एकटे म्हातारे सिगारेट आणि बीअरचा आस्वाद घेताना दिसतात. वयस्कर आणि तरुण पिढीत एक छुपा संघर्ष युरोपमध्ये सुरू आहे, तो म्हणजे वयस्कर पिढीला सांभाळण्यासाठी तरुण पिढीने किती टॅक्स भरायचा? म्हाताऱ्या होत असलेल्या जर्मनीतही तो चालूच आहे. आपले म्हातारपणाचे चित्र पाहून तरुण आज गुमान 35 ते 40 टक्के इन्कम टॅक्स भरतात आणि सरकार आपला सांभाळ करेल, याची खात्री करून घेतात. भारतात 144 कोटीतील आठ कोटी नागरिक आज इन्कम टॅक्स भरतात आणि उणापुरा आठदहा लाख कोटी रुपये त्यातून जमा होतात आणि वयस्करांची संख्या पोचली आहे 15 कोटीच्या घरात! हे तुलना करण्यासाठी अजिबात नाही. भारताने कुटुंब व्यवस्था का जपली पाहिजे, याची जाणीव होण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.
जर्मनीत सायकल चालविणारे सर्व प्रकारचे नागरिक दिसतात कारण थंड हवा, समृद्धी आणि सायकल चालविण्यासाठी येथे केलेल्या सोयी. भारतात यातले काहीच मिळू शकत नाही, त्यामुळे भारतातील जे नवश्रीमंत शहरांत सायकलीचे असेच लाड करण्याचा अट्टाहास करतात, त्यांना अखेर नैराश्य येते! बाकी बाजूला ठेवू, पण भारतीय रस्त्यांवर जागाच नाही, त्याचे काय? परदेशी सोयी सुविधांची नक्कल करण्याच्या हट्टाहासापोटी खर्च खूप होतो, पण त्यावर झालेला खर्च काळ खाऊन टाकतो, हे चित्र पुण्यासारख्या शहरांत हमखास पाहायला मिळते. पुण्याच्या रस्त्यांवर केले गेलेले सायकल ट्रॅक शोधण्याची स्पर्धा लावली तरी ते सापडणार नाहीत आणि बीआरटी हवी की नको, ही चर्चाही कधीच संपणार नाही. कारण ती नक्कल आहे आणि राहील.
लक्षात एक नक्की येते की या देशांशी आपण अजिबात तुलना करता कामा नये. आपले प्रश्न खूप वेगळे आहेत आणि त्याची उत्तरे आपण आपलीच शोधली पाहिजेत. अर्थात, हे पुन्हा काही क्षण आणि एका खिडकीतून केलेले निरीक्षण. त्याच्या सर्व मर्यादा मान्य करूनच पुढे जावे लागेल.