भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जीवनचरित्राचे प्रकाशन
दिल्ली – राजकारणामधून कोणी निवृत्त होऊ नये, विशेषतः जे एखाद्या विचारधारेचा वारसा घेऊन पुढे जातात त्यांनी तर कधीच राजकारणातून निवृत्त होऊ नये असा सल्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.
भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जीवनचरित्र असलेल्या ‘ फाइव डिकेडस इन पॉलिटिक्स’ या ग्रंथाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे खरगे यांच्या हस्ते झाले , त्यावेळी ते बोलत होते. हार्पर कोलिन्स इंडिया या प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. रशीद किडवई यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह देखील उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस शिपायापासून ते देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत केलेला प्रवास थक्क करायला लावणारा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही शिंदे यांनी चांगले कार्य केले असेही खरगे याप्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, ”मी गृहमंत्री असताना शिक्षणतज्ञ विजय धर यांनी श्रीनरच्या लाल चौकात जाऊन भाषण करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी लाल चौकात जाऊन भाषण केले. त्यावेळी देशभर माझे निडर गृहमंत्री म्हणून कौतुक झाले, मात्र त्यावेळी मी मनातून घाबरलो होतो. ”
या ग्रंथात भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिंदे यांच्याविषयी म्हटले आहे की, ‘शिंदे यांचे जीवन म्हणजे एक प्रकारे भारताचा इतिहास आहे’. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे ‘सुशीलकुमार शिंदे यांनी कठीण परिस्थितीवर मात करुन आयुष्यात खूप काही साध्य केले आहे.’ सोनिया गांधी यांनी म्हटले आहे ‘काँग्रेसच्या मूलभूत मूल्यांचे प्रतीक सुशीलकुमार शिंदे आहेत.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे ‘कितीही कठीण परिस्थिती असली तरी सुशीलकुमार शिंदे हे विचलित होत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम असते’.