सोलापूर, दि. ४- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सोळाव्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या उत्कर्ष महोत्सवास आज (रविवारी) उत्साहात प्रारंभ झाला. विद्यापीठ परिसरात सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य आणि रंगतदार शोभायात्रेने या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद काळे, क्षेत्रीय संचालक (महाराष्ट्र व गोवा) डॉ. अजय बा. शिंदे, फुलचंद नागटिळक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. सानवी जेठवानी, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, एम. डी. कांबळे आदी उपस्थित होते.
या महोत्सवात महाराष्ट्रातील 1६ विद्यापीठांमधील सुमारे साडेतीनशे एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले असून, युवकांच्या सामाजिक जाणीवा, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि नेतृत्वगुणांना व्यासपीठ देण्याचा उद्देश या महोत्सवामागे आहे. शोभायात्रेत मुंबई, पुणे, नागपूर, गडचिरोली, अमरावती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आदी विविध विद्यापीठांचे स्वयंसेवक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. शाश्वत विकासाच्या थीमवर ढोल-ताशांच्या गजरात, देशभक्तीपर घोषणा, लोककलांचे सादरीकरण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांनी परिसर भारावून गेला होता.
कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी महोत्सवाचे उद्घाटन करताना सर्व स्वयंसेवकांचे स्वागत केले. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवेची भावना आणि संस्कृतीची जपणूक रुजविण्यात एनएसएसचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. “उत्कर्ष महोत्सव हा केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नसून युवकांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे,” असे त्यांनी नमूद केले.
महोत्सवाच्या कालावधीत आता तीन दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक प्रश्न, पर्यावरण संवर्धन, स्त्री-सशक्तीकरण, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता यावर या उत्कर्ष महोत्सवात भर देण्यात येणार आहे.

