कोल्हापूर : रेडिओ हे कायम टिकून राहणारे माध्यम आहे. रेडिओत काम करताना मनोरंजनाबरोबरच विश्वासार्हता जपा, असे आवाहन आरजे झाहिद यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात रेडिओ दिनानिमित्त “रेडिओची बोली” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, शिववाणी रेडिओचे कार्यक्रम निर्माता अभिषेक पाटील, श्रोत्यांचे प्रतिनिधी मतीन शेख, तंत्रज्ञ रोहित भारतीय, कल्याणी अमणगी, माहिती अधिकारी वृषाली पाटील, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. उदय पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील उपस्थित होते. आरजे झाहिद म्हणाले, अनेक आव्हानांना सामोरं जात कोणत्याही माध्यमात काम करताना खात्रीशीर व अधिकृत माहिती द्या. प्रत्येक काम चांगल्यात चांगल्या पद्धतीनं करा. रेडिओवर बोलताना आपला आवाज, उच्चार महत्वाचा असतो. यासाठी तुमचा आवाज जोपासा. आश्वासक बोलणं ठेवा. सुरांचा सराव करा. श्वासाचा व्यायाम करा. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्या. रेडिओत काम करताना ऐकणाऱ्याच्या मनात शिरण्याची कला अवगत करा. कोणतंही काम करताना आधी त्या कामाची रुपरेषा ठरवून त्यानुसार काम करा.या दहा वर्षांत रेडिओवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचं स्वरुप बदललं आहे. खासगी रेडिओ चॅनल हे विविध वयोगटातील श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचं काम करतात. परंतू कोणत्याही माध्यमातून मनोरंजनाबरोबरच आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियात काम करताना खात्रीशीर माहितीचीच देवाणघेवाण करा. रेडिओ सारख्या माध्यमांत काम करताना बदलत्या परिस्थितीनुसार त्या त्या माध्यमाच्या गरजेनुसार माहिती देता आली पाहिजे. तुमची बोली बदलता आली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.प्रस्ताविकात डॉ. शिवाजी जाधव यांनी शिववाणी रेडिओ चॅनलच्या वतीने घेण्यात येत असलेले उपक्रम व कार्यक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन कल्याणी अमणगी यांनी केले. पाहुण्यांची ओळख अभिषेक पाटील यांनी करून दिली. आभार रोहित भारतीय यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो : रेडिओ दिनानिमित्त आयोजित ‘रेडिओची बोली’ या विषयावर मार्गदर्शन करताना आरजे झाहिद.