चंदनशिवे यांच्या शाहिरीने श्रोते भारावले
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अ अध्यासन केंद्राचे उद्घाटन तसेच मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे विभागप्रमुख, शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरी व पोवाडे प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 21 जुलै 2025 रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईचे सुप्रसिद्ध शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरी आणि पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. चंदनशिवे यांनी शाहिरी आणि पोवाडे पहाडी आवाजात गाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची आठवण करून दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, केंद्राचे समन्वयक डॉ. अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी केले. डॉ. परमेश्वर हटकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे, अजय देहाडे, शिवाजी वाघमारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे गुणगान व गौरव करणारे शाहिरी, पोवाडे सादर करत उपस्थित रसिक, श्रोत्यांना भारावून सोडले. यात ‘सर्वांना वेड लावी अशी देखणी.. मनात माझ्या अण्णाभाऊंची लेखणी’, भीमाईच बाळ.., ‘जग बदल… सांगूनी गेले मला भीमराव..’, जय जय होळकरशाहीचा…. अशा एका पेक्षा एक सरस शाहिरी, पोवाड्यामधून श्रोत्यांना प्रभावित केले
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावरीलही शाहिरी, पोवाडे सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.या कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. गौतम कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. फोटो ओळी सोलापूर: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईचे सुप्रसिद्ध शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरी आणि पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे व अन्य.