विद्यापीठ अनुदान आयोगाचा विद्यापीठांना आग्रह
नवी दिल्ली -विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल असा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यू.जी.सी.) दोन वर्षांपूर्वीच जारी केलेला आहे . मात्र विद्यापीठे या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निदर्शनास आले आहे . विद्यापीठांनी या आदेशाची योग्य अमलबजावणी करावी असा आग्रह यू.जी.सी. ने धरला आहे.
या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी देशातील विद्यापीठांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की एप्रिल 2022 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण करता येतील अशा प्रकारचा निर्णय घेतला . हा निर्णय सर्व विद्यापीठांना तेव्हाच कळविण्यात आलेला आहे . विद्यार्थ्यांना एकावेळी दोन अभ्यासक्रम करू द्यावेत या संदर्भात माहिती दिलेली आहे . मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाकडे विद्यापीठे डोळेझाक करताना दिसत आहेत . वेगवेगळी कारणे सांगत विद्यार्थ्यांना दोन अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात नाही. अनेकदा विद्यार्थ्यांना मायग्रेशन मिळत नाही या कारणास्तव दोन अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही .विद्यापीठांनी या संदर्भात योग्य ती उपाययोजना करावी आणि विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ द्यावेत असेही जोशी यांनी म्हटले आहे .
विद्यापीठ अनुदान आयोगाने एका विद्यार्थ्यांला एकाच वेळी दोन अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा असे म्हटलेले असले तरी विद्यार्थ्यांच्या दाखल्याचा प्रश्न तसेच मायग्रेशनचा प्रश्न कसा सोडवायचा या संदर्भात स्पष्टता नाही . त्याचप्रमाणे कोणत्याही अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी असायला हवी अशा प्रकारचा विद्यापीठ अनुदान आयोगाचाच नियम आहे . जर विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर तो विद्यार्थी दोन ठिकाणी उपस्थित राहणे कसे शक्य आहे ? एका ठिकाणी तो अनुपस्थित राहील . अशा वेळी त्याची एका अभ्यासक्रमास अनुपस्थिती असताना त्याला परीक्षा देण्यास कशी परवानगी द्यावी ? हा देखील प्रश्न महाविद्यालय आणि विद्यापीठांना पडलेला आहे या संदर्भातही विद्यापीठ आयोगाने स्पष्ट केलेली नाही . त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याच्या संदर्भामध्ये विद्यापीठांनी अद्याप पर्यंत कार्यवाही केलेले नाही असे विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले .