Sunday, January 25, 2026
Homeशिक्षणबातम्यावि.स. खांडेकर हे अव्वल दर्जाचे ध्येयवादी लेखक: विनोद शिरसाठ

वि.स. खांडेकर हे अव्वल दर्जाचे ध्येयवादी लेखक: विनोद शिरसाठ


कोल्हापूर, दि. २२ जानेवारी: वि. स. खांडेकर यांच्या साहित्याने एका पिढीला ध्येयवादी बनविले असे मत साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि डॉ. अनंत व श्रीमती लता लाभसेटवार प्रन्यास आयोजित भाषा संवर्धन पंधरवड्यात ‘खांडेकरांचा ध्येयवाद पराभूत झाला आहे काय?’ या विषयावर ते बोलत होते. माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्षस्थानी होते.

खांडेकरांचे साहित्य वाचून कोणी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. कोणी शिक्षकीपेशा स्वीकारला. कोणी सहकार, शेतीकडे, व्यापाराकडे वळले. हाच त्यांचा वैश्विक दृष्टिकोण असलेला ध्येयवाद होय. काळाच्या पटलावर लेखकाचे साहित्य किती वाचले जाते, यावर त्या साहित्याचे मूल्यमापन ठरत असते. अशा अनेक कसोट्यांवर टिकणारे खांडेकर हे अव्वल दर्जाचे ध्येयवादी लेखक होते, असे सांगून शिरसाठ म्हणाले, लेखनात आणि प्रत्यक्ष जीवनात कमालीची सच्चाई असणारा लेखक म्हणून खांडेकरांना ओळखले जाते. त्यांच्या गरज कमी होत्या. मी आणि माझे कुटुंब यापलीकडे त्यांची दृष्टी होती. त्यांची मनोभूमी मांगल्याची आस धरणारी होती. त्यांनी पूर्वजन्मीच्या कृत्यांचा व मृत्यूनंतरच्या प्रवासाचा कधीच विचार मांडला नाही, तर ध्येयाची तुतारी फुंकण्यास समाजाला प्रवृत्त केले. खांडेकरांचा ध्येयवाद पराभूत झालेला नाही. उलट उत्तरोत्तर त्याची औचित्यता अधिक वाढत राहिली आहे.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. हिर्डेकर म्हणाले, आदर्श ध्येयवाद कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून खांडेकरांच्या साहित्याकडे पहावे लागते. त्यांचे साहित्य वर्तमानाची जाणीव करून देते. स्वप्नीय गुंगीतून जागे करते. टोकाच्या नकारात्मक विचारांपासून परावृत्त करते. विशेषत: विद्यार्थी वर्गाने त्यांच्या साहित्याशी जोडून घेणे गरजेचे आहे.
यावेळी अमेरिकास्थित डॉ. अनंत लाभसेटवार यांनी खांडेकर यांच्या साहित्याप्रती कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी प्रा. आर. जी. कुलकर्णी, डॉ. नीलांबरी जगताप, महावीर शास्त्री आणि विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments