संभाजीनगर ( औरंगाबाद ) – लेखक शाहू पाटोळे यांच्या ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या मराठी भाषेत गाजलेल्या पुस्तकाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. आता ‘हार्पर कोलिन्स’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने याची दखल घेतली आणि जगभरातल्या वाचकांसाठी हे पुस्तक इंग्रजी भाषेत ‘ दलित किचन्स ऑफ मराठवाडा’ या शीर्षकाखाली उपलब्ध करुन दिले आहे. भूषण कोरगावकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजित भाषांतर केले आहे.
मराठी भाषेतील ख्यातनाम लेखक आणि निवृत्त सरकारी अधिकारी शाहू पाटोळे यांचे ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे पुस्तक आठ वर्षापूर्वी जनशक्ती वाचक चळवळ व्दारे प्रकाशित झाले, तेव्हा त्याची खूप चर्चा झाली. दलित साहित्यात उल्लेख असलेल्या दलितांच्या खाद्यजीवनाबद्दल, त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल कोणीही सविस्तर मागोवा वा संशोधन केले नाही. दलित गावकुसाबाहेर राहिले तशी त्यांची खाद्यसंस्कृतीसुद्धा गावकुसाबाहेरच राहिली . शाहू पाटोळे यांनी या गावकुसाबाहेरील खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण करायचे ठरवले. त्यातूनच हा ग्रंथ तयार झाला . त्या ग्रंथावर आजवर अनेक ठिकाणी चर्चाही झाली . या देशातील बहुतांश लोक मांसाहारीच आहेत. त्यातही गावकुसाबाहेरील लेाकांची खाद्यसंस्कृती वेगळी आहे याविषयी शाहू पाटोळे या ग्रंथात मांडणी केली . त्यांनी काही पदार्थ तयार करण्याच्या पध्दतीही या ग्रंथात नमूद केल्या होत्या. मनुष्य हा मुळात मांसाहारी असून कालपरत्वे कसा बदलत गेला हे यात स्पष्ट केले आहे. आजही ग्रामीण भागात कंदुरी, नवसं चालतात. भूक आणि धार्मिक चालिरीतीची सांगड कशी घातली गेली हे त्यात त्यांनी मांडले.’ दलित किचन्स ऑफ मराठवाडा’ या इंग्रजी अनुवादामुळे हे पुस्तक जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध झाले असून ऍमेझॉन आणि किंडलवर वर उपलब्ध आहे.
एका पुरुषाने खाद्य संस्कृतीवर लिहलेले पुस्तक म्हणून तर ते वेगळे होतेच मात्र त्याहूनही अधिक ते खाद्य संस्कृतीच्या चुलीच्या जाळाभोवती आणि जेवणाच्या पात्राभोवती संदिग्ध स्वरुपात वावरणारा आपला धार्मिक, जातीय, वर्गीय इतिहास यावर भाष्य करणारे हे पुस्तक आहे.याची तिसरी आवृत्ती अशातच प्रकाशित झाली आहे. शाहू पाटोळे नोकरीनिमित्त अनेकवर्षे नागालँडमध्ये होते. त्यावर आधारित कुकनालिम हे त्यांचे पुस्तकही 2022 मध्ये प्रकाशित झाले.