Wednesday, March 12, 2025
Homeकलारंजनशिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव

23 फेब्रुवारी रोजी प्रारंभ

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव येत्या २३ ते २५ फेब्रुवारी या काळात साजरा करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता सांस्कृतिक शोभायात्रेने महोत्सवाला प्रारंभ होईल.

रविवारी सकाळी १० वाजता प्राणीशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्पंदन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर दिवसभरात रांगोळी व स्थळचित्र, सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन आणि समूहगीत स्पर्धा होतील.सोमवारी (दि. २४) सकाळी ७.३० वाजता वाद्यमहोत्सव साजरा करण्यात येईल. क्रांतीवन परिसर (गेट क्र. ८ जवळ), संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलाव परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यासमोरील उद्यान, मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसर या ठिकाणी देशभरातील विविध लोकवाद्यांच्या वादनाचा रसिकांना आनंद घेता येईल.

दुपारी ४ वाजता राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात या सर्व लोकवाद्यांचे सामूहिक वादन करण्यात येईल. या दिवशी मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका या स्पर्धा होतील.मंगळवारी (दि. २५) एकल नृत्य, समूह नृत्य स्पर्धा होतील. त्यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होईल. या कार्यक्रमांचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले आणि महोत्सव समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments