कोल्हापूर, दि. ४ जानेवारी: शिवाजी विदयापीठाच्या विकासात महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे उल्लेखनीय योगदान आहे. विदयापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर नेण्यामध्येही विज्ञान विद्याशाखेकडील महिला संशोधकांचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी काढले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रामार्फत ‘अभ्यासक्रमातील महिलांविषयक दृष्टिकोन’ या विषयावरील कार्यशाळा 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली. तिच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या महिलाविषयक धोरणांची चर्चा त्यांनी केली.कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विदयापीठाचा परिसर विदयार्थिनींसाठी अत्यंत सुरक्षित आहे. अधिविभागात शिकणाऱ्या विदयार्थिनींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, लवकरच नवीन विद्यार्थिनी वसतीगृह उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कुलगुरु यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘संवादसेतु’ या उपक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
विद्यापीठाच्या संशोधनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि विविध अधिकार मंडळांवर निवडून आलेल्या तसेच नियुक्त झालेल्या महिला प्राध्यापकांचा सत्कार कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ.पद्मा दांडगे (जैवरसायनशास्त्र), अधिसभा सदस्य डॉ. माधुरी वाळवेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रतिमा पवार, विद्यापरिषद सदस्य डॉ. रूपाली संकपाळ, अंतर्गत तक्रार निवारण समिती अध्यक्ष डॉ. वर्षा जाधव, लोकविकास केंद्राच्या डॉ. मंजुषा देशपांडे यांचा समावेश होता.
कार्यशाळेत शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, कायदा सल्लागार अॅड. अनुष्का कदम आणि लोकविकास केंद्राच्या डॉ. मंजुषा देशपांडे यांनी महिलांविषयक दृष्टीकोनाची आवश्यकता या विषयांची मांडणी केली. स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. निशा मुडे- पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आणि आभार मानले.