संविधान समता दिंडींचा पंढरपूर येथे समारोप
पंढरपूर – ज्ञानदेव महाराज, नामदेव महाराज, चोखा मेळा यांनी जो विचार मांडला तो तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांनी पुढे नेला. तोच समतेचा विचार संविधानातही मांडलेला आहे असे विचार विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव एज्युकेशनचे दादासाहेब रोंगे यांनी संविधान समता दिंडीच्या समारोप प्रसंगी मांडले.
पुणे येथील महात्मा ज्योतिराव फुले वाडा येथून 1 जुलै 2024 रोजी निघालेल्या संविधान समता दिंडीचा समारोप 16 जुलै 2024 रोजी पंढरपूर सकाळी 10 वाजता पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान दर्शन मंदिर येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी पंढरीभूषणचे संपादक शिवाजी शिंदे,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, ग्रामगीतेचे भाष्यकार ज्ञानेश्वर दादा रक्षक, सेवकराम मिलमिले, ह.भ.प.भारत महाराज, घोगरे गुरुजी, रवी मानव , सारंग कोळी , दादा महाराज पनवेलकर, कीर्तनकार भाऊसाहेब, दिंडी चालक श्यामसुंदर महाराज सोन्नर आदी मान्यवर उपस्थित होते.
तुकाराम महाराजांनी भेदाभेद अमंगळ असे म्हणत समतेचा विचार सांगितला. तोच विचार संविधानात मांडण्यात आला आहे. आपण सारे संविधानाचे वाहक आहोत असेही दादासाहेब रोंगे आपल्या भाषणात पुढे म्हणाले.
प्रास्ताविक श्यामसुंदर महाराज सोन्नरयांनी केले. ते म्हणाले संविधानाला बदनाम करणयचे प्रयत्न केला जात आहे, काही कीर्तनकारही या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. वारकरी संतांनी ज्या समतेच्या विचारांची पेर्णी महाराष्ट्रात केली, त्या समतेच्या विचारावर संविधान आधारलेले आहे हा संदेश देण्यासाठी दरवर्षी ही संविधान समता दिंडी काढली जाते. संविधानाचा जागर यातून केला जातो.
पंढरीभूषणचे संपादक शिवाजी शिंदे म्हणाले पंढरपूर पुरोगामी विचाराचे केंद्र आहे. संविधान बचाव मोहीम पंढरपूरच्या गाडगेमहाराज मठातून सुरु केली. समता दिंडीला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षी अधिक व्यापक कार्यक्रम होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दादा महाराज पनवेलकर यांनी सांगितली की, मी दोन दिंड्यांचा संचालक आहे, त्या दिंड्या सोडून संविधान समता दिंडीसोबत चालत असतो कारण डा. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वत्र पोहोचला पाहिजे. ब्रम्हकीर्ती महाराज म्हणाले सर्व वारक-यात संविधान दिंडीचा विचार पोहोचला आहे. संविधान दिंडीत आम्ही पुढील वर्षीही सहभागी होऊ. संविधान विचाराच्या समर्थनासाठी आम्ही सधैव सोबत आहोत.
ह.भ.प.भारत महाराज म्हणाले संविधान व्यवस्था आहे, संत विचारात आचरण आहे. या दोन विचारांसह पुढे गेलो तर कोणतीही शक्ती आपणास अडवू शकणार आहोत. ही ख-या अर्थाने संत विचाराची दिंडी आहे. संताचा विचार आणि संविधानाची व्यवस्था यानुसार चाललो तर विकास नक्की होईल.
संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा समताभूमी, महात्मा ज्योतिराव फुले वाडा पुणे येथे सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडला. अनेक मान्यवर या समता दिंडीत जागेजागी सहभागी झाले.