पुणे – राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विज्ञान कादंबरीचे प्रकाशन नुकतच पुणे येथे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. यावेळी मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि डॉ. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.केशव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
“1695, स्मार्ट रोबो,एआय आणि औरंगजेब” असे या कादंबरीचे नाव आहे. एआयच्या मदतीने, औरंगजेबाच्या जहाजावरील दरोड्याचा शोध घेण्याची कल्पना अफलातून आणि अदभूत असल्याचे मत यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. कुमारांसोबत त्यांच्या पालकांनांही ही कादंबरी आवडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राजहंस प्रकाशनातर्फे कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत या पुस्तकाला पहिले पारितोषिक मिळाले.
या पुस्तकाची पाठराखण सुप्रसिध्द विज्ञान कथा आणि कादंबरी लेखक श्री सुबोध जावडेकर यांनी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे ” राजहंस प्रकाशनाने आयोजित केलेल्या ‘ कुमारवयीन वाचकांसाठी विज्ञानकादंबरी’ लिहिण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी ही कादंबरी केवळ कुमार वाचकांनाच नाही, तर प्रौढ वाचकांनांही रंजक वाटेल अशी आहे. कादंबरीचे कथानक फार विलक्षण आहे. इसवी सन 1695 औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षाचा मुलगा करतात. त्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा उपयोग करुन घेतात. ही कल्पनाच मुळी अफलातून आहे. विज्ञान कादंबरी असली तरी लेखकाने तिच्यात तांत्रिक माहितीचा भडिमार केलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव याबद्दलची माहिती अधूनमधून कादंबरीत येते. पण ती जरुर तेव्हढीच आणि निवेदनाच्या ओघात येते. वाचकाचे कुतूहल जागृत व्हावे पण त्याला अडखळायला होऊ नये अशा बेताने. कादंबरीतील व्यक्तिरेखा ठसठशित उतरल्या आहेत. संवाद सहजसुंदर आहेत. विज्ञान अचूक आहे आणि रहस्य वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले,की संपूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवता येत नाही.”
(प्रकाशक राजहंस. किमंत 240/- रुपये. पत्ता-राजहंस प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड, 1025, सदाशीव पेठ, पुणे 400030, दूरध्वनी-020- 24473459)