होय, मेधा पाटकर यांच्या अगणित संपत्तीची चौकशी व्हायलाच पाहिजे खादीच्या किती साड्या भांडारात आहेत आणि स्लीपर किती संग्रही आहेत याची संख्या जाहीर झालीच पाहिजे. खांद्यावर अतिशय जड पिशव्या ती वाहते,
त्या पिशव्यांत नेमके असते काय ?
हे देशाला ED ने सांगितलेच पाहिजे
जीवनशाळा नावाच्या अनेक शाळा ती चालवते,
त्या शाळांमध्ये ती डोनेशन तर घेत नसेल ना ?
त्याचाही हिशोब मांडलाच पाहिजे
हेरंब कुलकर्णी यांच्या कवितेच्या या काही ओळी आहेत. नर्मदा घाटीतील लोकांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य हक्कांसाठी मेधा पाटकर यांनी 15 जून 2024 पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व आदेशांचे आणि कायद्यांचे पालन करून नर्मदा घाटीतील ज्या लोकांचे पुनर्वसन चुकीच्या पद्धतीने झाले आहे किंवा अद्याप पुनर्वसन बाकी आहेत अशा आदिवासींना न्याय द्यावा या मागणीसाठी हे बेमुदत उपोषण सुरू झालेले आहे .सत्तरी पार केलेल्या मेधा पाटकर यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागावे ही परिस्थिती का निर्माण झाली ? या प्रश्नांची उत्तरे शासनाने देणे गरजेचे आहे .मागील 40 वर्षापासून मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन सुरू आहे .मात्र या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत
मेधा पाटकर यांच्याविरुध्द तक्रार
मेधा पाटकर आणि सहकारी नर्मदेच्या खोऱ्यात तीन दशके जीवनशाळा चालवत आहेत. या शाळांचा आपल्यापैकी अनेकांना प्रत्यक्ष अनुभव आहे. अभावग्रस्त भागातील मुलांना कशाप्रकारे शिक्षण देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने केलं जात आहे, यावर अनेकांनी लिहिलेही आहे.मेधा पाटकरांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणातील निधीचा दुरुपयोग केल्याची तक्रार तेमला बुजूर्ग या गावातील नागरिक प्रीतमराज बदोले याने पोलिसांत दाखल केल्यानंतर बरवानी जिल्हा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्यासह 11 जणांवर फिर्याद दाखल केली आहे.याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही वर्षांपूर्वी पाटकर यांच्यावर गुजरातमध्ये हल्ला केला होता.
मेधा पाटकर व अन्य कार्यकर्त्यांनी राजकीय व देशविरोधी कारवायांसाठी निधी खर्च केला, असा मुख्य आरोप आहे. पोलिसांनी मेधा पाटकर, परवीन रुमी जहांगीर, विजया चौहान, कैलाश अवसाया, मोहन पाटीदार, आशिष मंडलोय, केवल सिंग वसावे, संजय जोशी, श्याम पाटील, सुनीत एसआर, नूरजी पडवी व केशव वसावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाचा निर्णय 1 जुलै रोजी
तिस-या बाजूला सध्याचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी 24 वर्षापूर्वी दाखल आलेल्या एका बदनामीच्या वैयक्तिक खटल्यात मेधा पाटकर यांना दिल्ली येथील एका न्यायालयात दोषी ठरविण्यात आले आहे. 1 जुलै 2024 रोजी न्यायालय त्यांना काय शिक्षा सुनावते ते स्पष्ट होईल .इ.स. 2000 मध्ये, विनय कुमार सक्सेना, जे तत्कालीन नॅशनल काउंसिल ऑफ सिविल लिबर्टीज चे अध्यक्ष होते, त्यांनी मेधा पाटकर यांच्या नर्मदा आंदोलनाच्या निषेधार्थ एक जाहिरात प्रसिद्ध केली. प्रत्युत्तरात पाटकर यांनी सक्सेना यांच्यावर टिप्पणी केली, ज्यात सक्सेना यांच्यावर देशभक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला होता आणि हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांबाबत सक्सेना यांनी 2001 मध्ये मेधा पाटकर यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. तब्बल 23 वर्षानंतर हा खटलाचा निकालाच्या टप्प्यावर आला आहे.
खरेच कराच ED चौकशी
सत्तरी पार केलेल्या , महात्मा गांधीच्या मार्गाने लढणा-या मेधा पाटकर यंची आजही अनेकांना भीती वाटते. हेरंब कुलकर्ण३ म्हणतात त्याप्रमाणे ED चौकशी कराच . कळू द्यात लोकांनीही काय सत्य आहे?