परदेशी खेळाडूही कौतुक व पाठराखण करीत असताना आपलेच काही भारतीय लोक ऑलिम्पिकमधील आपल्याच काही खेळाडूंवर वाट्टेल ते आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात ,हा देशद्रोहच आहे. रवींद्र चिंचोलकर यांचा लेख .
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2024 दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . फ्रान्सने अतिशय उत्कृष्ट रीतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते .ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच यावेळेस पॅरिस मधल्या सीन नदीच्या किनारी भव्य उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . हा उदघाटन सोहळा जगभरासाठी लक्षवेधक ठरला .
देशद्रोही कूपमंडूक
भारतीयांच्या दृष्टिकोनातून ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वेगळ्याच अर्थाने चर्चेत आली .क्रीडा स्पर्धेमध्ये केवळ खेळभावना दिसायला हवी आणि आपल्या खेळाडूंना तर आपण प्रोत्साहनच द्यायला हवे .मात्र आपल्या देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये शिरलेले राजकारण आपल्याच खेळाडूंमध्ये भेदभाव करत असल्याचे चित्र दिसून आले . त्याच राजकारणाच्या आडून आपल्याच काही खेळाडूंवर वाट्टेल ते आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपलेच काही देश बांधव करताना दिसले . हा प्रकार त्यांच्या कूपमंडूक आणि देशद्रोही वृत्तीचा पुरावा देतो .
फोगाट कुटुंबाची देशसेवा
विनेश फोगाट ही भारतीय कुस्ती पटू ज्या फोगाट कुटुंबातून आली आहे, त्या कुटुंबाने आपल्या देशाचे नाव महिला कुस्तीच्या संदर्भात खूप उंचावले आहे . 53 किलो वजनी गटामध्ये खेळणारी विनेश फोगाट ऑलिम्पिक साठी आपल्या मर्जीने 50 किलो वजनी गटात गेली नव्हती . ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 53 किलो वजनी गटातून अंतिम पंघाल आधीच पात्र ठरली होती .त्यामुळे विनेश फोगाटने 50किलो वजनी गटातून ऑलिंम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करावा लागला . विनेश फोगाटने चाचणी स्पर्धेत शिवानी पवारला पराभूत केले ,त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेत 50 किलो वजनी गटात तिना स्थान दिले गेले . .
पॅरिसला गेल्यानंतरआपल्या स्पर्धकांना पराभूत करीत विनेश थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचली . तो पर्यंत सारे व्यवस्थित होते . विनेश सुवर्णपदक मिळवणार अशी खात्री सर्वांना वाटत होती .मात्र अंतिम सामना खेळण्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने अंतिम फेरी खेळण्यापूर्वीच विनेशला अपात्र घोषित करण्यात आले .ऑलिम्पिक नियमानुसार हे घडले .त्यावर विनेशने अपीत केले आहे त्याचा निर्णय व्हायचा तो होईल .
विनेशचा दोष काय ?
विनेश फोगारने कुठलेही उत्तेजक औषध घेतलेले नव्हते किंवा कुठलाही गैरप्रकार केलेला नव्हता . वजन तर अनेक खेळाडूंचे अधिक भरते. असे असताना केवळ राजकीय विचाराच्या भावनेतून अनेक भारतीयांनी विनेशवर खोट्या आरोपांची सरबत्ती केली . अमेरिकेच्या कुस्तीपटू जॉर्डन बुरोजने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट रौप्य पदकाची हक्कदार आहे आणि तिला ते दिले जावे अशा प्रकारची मागणी केली आहे . मात्र काही भारतीय लोकच विनेश विरुद्ध गरळ ओकत राहिले .
अंतिम पंघालने भारताची मान खाली घातली
खरे तर . मध्ये ऑल्2म्पिक 2024 मध्ये भारताची लाज विनेशच्या हक्काच्या 53 किलो वजनी गटात खेळलेल्या अंतिम पंघालने घालवली आहे . ऑलिम्पिक क्रीडा नगरीमध्ये जाण्याचा पास फक्त खेळाडूंना मिळतो . याबाबतचे नियम खूप कडक आहेत, असे असताना अंतिम पंघालने तिचा पास तिच्या बहिणीला दिला . पॅरीसच्या पोलिसांनी तिला क्रीडा नगरीत घुसताना पकडले , पोलिस ठाण्यात नेले. .त्यानंतर ऑलिम्पिक असोसिएशनने अंतिम पघाल आणि तिच्या बहिणीला पॅरीस क्रीडा नगरी सोडून भारतात रवाना होण्याचे आदेश दिले .या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मुद्द्यावर सर्वांनाच लाज वाटली आहे. या प्रकरणी अंतिम पंधालसह प्रशिक्षकावर 3 वर्षांची बंदी घातली जाण्याचा धोका अद्याप कायम आहे .भारताची लाज घालवणाऱ्या या अंतिम पंघाल बद्दल कोणी काहीही बोलत नाही हे विशेष . हे प्रकरण दडपून टाकण्याचाच प्रयत्न केला जात आहे.
विनेशचे व्टिट
ब्रिजभूषणची सेवेकरी असलेली ट्रोल आर्मी विनेश फोगाटवर तूटून पडली आहे . भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यानी केलेल्या महिला खेळाडूंच्या शोषणाविरुद्ध आणि छळाविरुद्ध विनेश आणि काही महिला खेळाडूंनी दिलेल्या लढ्याची पार्श्वभूमी यामागे आहे . यासंदर्भाने एप्रिल 2024 मध्येच विनेशने केलेल्या एका ट्विटमध्ये शंका व्यक्त केली होती की “मला ऑलिंम्पिक संघामध्ये प्रवेश मिळू नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत . बिजभूषण सिंह यांचेच सहकारी भारतीय ऑलिंपिक संघाच्या व्यवस्थापनासाठी नेमले आहेत ,ते मला जागोजागी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत .कदाचित माझ्या खाण्यापिण्याच्या पदार्थातही काही मिसळले जाण्याचा धोका आहे “.
विनेशच्या या व्टिटवरून लक्षात येते की ऑलिम्पिक संघात तिचा सहभाग झालेला असला, तरीही तिला राजकारण करून पदोपदी तिला त्रास दिला गेला .वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाटला जेव्हा ऑलिंम्पिक स्पर्धेत अपात्र ठरविण्यात आले तेव्हा तिच्या बाजूने उभारणाऱ्या भारतीयांची संख्या तिला ट्रोल करणारांच्या किती तरी पट मोठी होती .
आपल्याच देशातील खेळाडूला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरविले गेले असता आनंद व्यक्त करणारे आपलेच काही भारतीय लोक आहेत, त्यांना देशद्रोहीच म्हणावे लागेल.आपला शत्रू देश म्हणवणाऱ्या पाकिस्तानमधील किंवा चीनमधील कोणीही अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली नाही . विनेशने मात्र कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत .या सर्वांनी विनेशला असा संदेश दिला आहे की ‘आम्ही तुझ्या पाठीशी आहोत , आमच्यासाठी तू सुवर्णपदक विजेती आहेस‘ . हरियाणा सरकारने तर विनेशचा सुवर्णपदक विजेती असे समजूनच सन्मान करू आणि तिला दीड कोटी रुपये बक्षीस देऊ असे जाहीर केले आहे .
नीरजची जात शोधली
ऑलिम्पिक 2020 मध्ये नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले .तेव्हा तो कोणत्या जातीचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न खूप जणांनी केला . त्यावेळी गूगलवर सर्वाधिक शोधला गेलेला हा विषय होता . नीरज मूळ आमच्या जातीचा आहे अशा प्रकारचा अभिमान अनेक जातींनी त्यावेळी मिरवला . त्यातूनही कोत्या वृत्तीची झलक दिसली होती . खेळामध्ये जातपात, धर्म आणि राजकारण कधीही आणले जाऊ नये . खेळ हा खेळ भावनेनेच खेळला गेला पाहिजे असे जगभर मानले जाते . तरीही पाकिस्तानी क्रिकेट संघा बरोबर भारतीय संघाचा मॅच मिटक्या मारत बघणारे आणि भारताने मॅच जिंकल्यावर फटाके वाजवणारेच ,हा मॅच भारतात होणार म्हटले की विरोधाची भूमिका घेतात . परदेशात सामने व्हावेत आणि भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाला हरवावे असे मात्र प्रत्येकाला वाटते. भारतात पाकिस्तानी संघाला खेळू देणार नाही यावर मात्र ते ठाम असतात, या मानसिकतेला काय म्हणावे ?
पदकांची संख्या घटली.
पॅरीसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये भारताला मागील ऑलिम्पिक च्या तुलनेत एक पदक कमी मिळाले . मागच्यावेळी एका सुवर्णपदकासह सात पदके भारताला मिळाली होती .यावेळी सहा पदके मिळाली, त्यात एकही सुवर्णपदक नाही .भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे . आपल्या एका जिल्हयाएवढे क्षेत्रफळ असणारे अनेक देश भारतापेक्षा कितीतरी अधिक पदके मिळवतात .मात्र भारताला पदकांची दुहेरी संख्याही गाठता येत नाही हे भारतीय क्रीडा विभागाचे अपयश आहे अनेक क्रीडा प्रकारात तर आपला सहभागही नसतो .भारतीय खेळात राजकारण केले जात असल्यामुळे भारताला ऑलिम्पिक मध्ये हवे तसे यश मिळत नाही हेच वास्तव आहे .
क्रिकेटचे लाड
भारतीय क्रिकेट संघाचे खूप लाड केले जातात एकही चेंडू न खेळणाऱ्या खेळाडूलाही कोटी -कोटी रुपये दिले जातात . दोनच दिवसांपूर्वी सायना नेहवाल या बॅडमिंटन पटूने म्हटले आहे की” क्रिकेट संघाला मिळतात तसेच सुविधा इतर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना भारताने उपलब्ध करून दिल्या, तर भारत ऑलिंपिक मध्ये खूप चांगली कामगिरी करू शकतो” . आघाडीच्या खेळाडूच्या या प्रतिक्रिये वरून देखील आपल्याला वास्तवाची जाणीव होते .
पॅरीस ऑलिम्पिक 2024 ने भारताला काय दिले ? याचा जर एकंदर विचार केला तर असे जाणवते की आपल्याच खेळाडूला दूषणे देणारे काही विकृत भारतीय आहेत, ही जाणीव आम्हाला दिली असे म्हणावे लागेल .
खेळभावना महत्वाची
या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने एक भारतीय म्हणून सर्वात आवडलेली गोष्ट अशी की नीरज चोप्रा च्या आई सरोज देवी म्हणाल्या की, “नीरजने मिळविलेले रौप्य पदक आम्हाला सुवर्णपदकासारखे आहे,आम्ही खुश आहोत . सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम हा सुद्धा आम्हाला मुलासारखाच आहे” . पाकिस्तानी खेळाडू नदीमच्या आई रजिया नेही नीरज चोप्रांबद्दल आपुलकी व्यक्त करत म्हटले” नीरज आणि नदीम चांगले मित्र आहेत ,नीरज मलाही ‘ मुलासारखा आहे . मी नदीम प्रमाणे नीरजसाठीही प्रार्थना केली “. एकमेकांना शत्रू मानणाऱ्या भारत आणि पाकिस्तान मधील या दोन माता मात्र खरी खेळ भावना दाखवत आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहे . पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांनी देखील म्हटले आहे “आपल्या मुलाला पराभूत करणाऱ्या खेळाडूला आपल्या मुलासारखे मानण्याचे मोठे मन केवळ एखाद्या मातेचेच असू शकते “.
खेळाकडे कसे पाहावे हे या दोन मातांनी जगाला दाखवून दिले आहे . विनेश फोगाटची निंदानालस्ती करणाऱ्यांनी या मातांकडून थोडी अक्कल घ्यावी .