केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे . संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी ही आनंद वार्ता आहे .
मग अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा अशी मागणी केली जात होती . त्या संदर्भात योग्य ते पुरावेही महाराष्ट्र सरकारकडून आणि मराठी भाषेच्या तज्ञांकडून सादर करण्यात आलेले होते .मात्र खूप वर्षापासून ही मागणी प्रलंबित होती .अखेरीस आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे .
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
या नवीन मान्यतेमुळे, अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भाषांची एकूण संख्या सहा वरून अकरा पर्यंत जवळपास दुप्पट होईल. तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या आधीपासून हा दर्जा असलेल्या भाषा होत्या.
अभिजात दर्जासाठी पत्रे, आंदोलन झाल्यानंतरही हा दर्जा कधी मिळणार या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळत नव्हते .
महाराष्ट्र साहित्य परिषद , रंगनाथ पठारे , मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे ,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र , हरी नरके यांच्यासह अनेक मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले . ,
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या भाषेचे महत्व वाढेल तसेच या भाषेतील अभ्यास आणि संशोधनाला अधिक चालना मिळू शकेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले .