लागोपाठ दुस-या वर्षी डी मार्ट प्रथम , हुरुन इंडियाचा अहवाल
मुंबई – एकविसाव्या शतकात ( सन 2000 नंतर ) स्वयंनिर्मित उद्योजकाने स्थापन केलेली सर्वात मौल्यवान भारतीय कंपनी म्हणून राधाकिशन दमानी यांनी स्थापन केलेली सुपरमार्केट चेन डीमार्ट ने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळविले असून या कंपनीचे मूल्य 3.42 लाख कोटी रुपये झाले आहे, असे हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
डी मार्टचे संचालन करणा-या एव्हेन्यू सुपरमार्ट्स या मूळ कंपनीच्या मूल्यांकनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी वाढ झाली असून क्रमवारीत त्यांचे अव्वल स्थान मजबूत झाले आहे. दिपिंदर गोयल यांनी स्थापन केलेली फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे मूल्यांकन 190 टक्क्यांनी वाढून 2.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. श्रीहर्षा मॅजेटी आणि नंदन रेड्डी यांनी स्थापन केलेल्या स्विगीने 1.01 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह 52 टक्के वाढ नोंदवत तिसरे स्थान मिळवले आहे.
डीमार्टने सलग दोन वर्षे अव्वल स्थान राखले असून गेल्या वर्षी फ्लिपकार्ट आणि झोमॅटोने अव्वल स्थान पटकावले होते. तथापि, फ्लिपकार्ट, पेटीएम, मॅक्स हेल्थकेअर आणि क्री कंपन्या ज्या एकेकाळी टॉप-10 मध्ये होत्या, त्या आता या यादीतून बाहेर पडल्या आहेत.
विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये दीप कालरा आणि राजेश मागोव यांनी स्थापन केलेली मेकमायट्रिप 99,300 कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह आणि याशीश दहिया आणि आलोक बन्सल यांनी स्थापन केलेली पॉलिसीबाजार सहाव्या क्रमांकावर आहे. भावित शेठ आणि हर्ष जैन यांनी स्थापन केलेल्या ड्रीम 11 आणि हर्षिल माथूर आणि शशांक कुमार यांनी स्थापन केलेल्या रेझरपेसारख्या इतर कंपन्यांच्या क्रमवारीत यावर्षी घसरण झाली.
अहवालातील सर्वोच्च 200 स्वयंनिर्मित उद्योजक एकत्रितपणे सुमारे 10 लाख लोकांना रोजगार देतात, जे या व्यवसायांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा लक्षणीय परिणाम दर्शवतात.
उल्लेखनीय आकडेवारीत फाल्गुनी नय्यर यांनी स्थापन केलेली ऑनलाइन सौंदर्य किरकोळ विक्रेता नायका ही महिला उद्योजकांच्या यादीत अव्वल आहे, तर झेप्टोची संस्थापक 21 वर्षीय कैवल्या वोहरा ही 41,800 कोटी रुपयांच्या व्यवसायासह सर्वात कमी वयाची उद्योजक आहे.