तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सान्वी जेठवानी यांचे आवाहन
सोलापूर – सर्वप्रथम आईवडील आपणाला स्वीकारत नाहीत म्हणून समाज स्वीकारत नाही, त्यामुळे तृतीयपंथीयांची परवड होते, घरापासूनच स्वीकाराला सुरुवात झाली पाहिजे. संपूर्ण समाजाने आपणाला स्वीकारले पाहिजे, त्यासाठी इतरांप्रमाणे आपणही सक्षम आहोत हे दाखवून द्या असे आवाहन ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड, महाराष्ट्र च्या सदस्या डॉ. सान्वी जेठवानी यांनी केले.
ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सान्वी बोलत होत्या. या परिषदेचे उदघाटन अमेरिकेतील तोवसन विद्यापीठ , मेरीलँड येथील डॉ. पल्लवी गुहा यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमाद्वारे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. सान्वी जेठवानी, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. गौतम कांबळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत , डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. अंबादास भासके, तांबोळी यांची मंचावर उपस्थिती होती.
याप्रसंगी डा. सान्वी जेठवानी यांनी सडेतोड भाषण केले. त्या म्हणाल्या तृतीयपंथी मूल आपल्या घरात जन्मू नये असे प्रत्येक आईवडिलांना वाटते. शाळेतही स्री आणि पुरुष हे दोनच प्रकार समाजात आहेत असे शिकवले जाते, त्5तीयपंथीयांना खिजगणतीतच घेतले जात नव्हते. आता 2019 मध्ये तृतीयपंथीयांसाठी संरक्षण कायदा झाला आहे. सर्वत्र तृतीयपंथीयांना समाजात स्वीकारले गेले पाहिजे, सन्मानाने वागविले गेले पाहिजे. यापुढच्या काळात तृतीयपंथीयांनीही आपण समाजातील इतर घटकांसारखेच सक्षम आहोत हे दाखवून दयावे असे त्या म्हणाल्या. सोलापूर विद्यापीठाने मानापासून तृतीयपंथीयांना सहाय्य करण्याचे काम सुरु केल्याचेही त्या म्हणाल्या.
तृतीयपंथीयांच्या संदर्भात सकारात्मक जागृती निर्माण करण्यात माध्यमांचा , त्यातही समाज माद्यमांचा वाटा मोठा आहे असे सांगून डॉ. पल्लवी गुहा आपल्या व्याख्यानात म्हणाल्या की, टालीसारखे काही चांगले चित्रपटही अलीकडे प्रदर्शित झाले आहेत.सरकार, संशोधक व अभ्यासक तृतीयपंथीयांचे जीवनमान बदलू शकतात. तसे प्रयत्न होताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिजमोहन फोफलीया आपल्या भाषणात म्हणाले की, सर्व क्षेत्रात मी सामाजिक काम केले, मात्र तृतीयपंथीयांविषयी काही केले नाही ही खंत मनात होती. मागील दोन वर्षांपासून तृतीयपंथीयांसाठी काम करायला सुरुवात केली. त्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एकत्र काम करु असे आवाहन केले. त्याचेच फलित म्हणून ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. यापुढेही भ्रपूर ाकार्य बाकी असल्याचेही ते म्हणाले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य आणि त्यांच्या समस्या याबाबत चर्चा व मंथन करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतलेला आहे. त्यांना प्राथमिक ते पदवी व संशोधनापर्यंत शिक्षण मिळण्यासाठी देखील विद्यापीठाने पुढाकार घेणार आहे. तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र निर्माण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखील दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर 21 मार्च 2025 रोजी सोलापुरात रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिषदेत 110 संशोधक, विद्यार्थी शोधनिबंध सादर केले आहेत. एकूण 250 जणांचा यामध्ये सहभाग आहे. या कार्यक्रमासाठी तृतीयपंथी तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अंबादास भासके यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रा. तारीक तांबोळी यांनी मानले.