सोलापूर – स्वातंत्र्यानंतर भारताला विकासाच्या मार्गावर कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीने अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यास मदत केली. आजही भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे भारताच्या शाश्वत विकासाठी कृषी क्षेत्रातील संकटावर उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हैद्राबाद येथील केंद्रीय विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. फनिंद्र गोयारी यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि पीएम उषा अंतर्गत विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी डॉ. गोयारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, प्रा. राम भोसले, प्रा. अश्वीनी पांढरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दिप प्रज्वलन करुन उद्धाटन करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ. गोयारी म्हणाले, देशात सर्वत्र विकसित भारत 2047 ची चर्चा सुरु आहे. मात्र देशाच्या शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आज कृषी क्षेत्रात लागवडीचा वाढता खर्च, पिक उत्पन्नामधुन मिळणारा कमी परतावा, कृषी क्षेत्रातील कमी गुंतवणुक, बजेट मधील कमी तरतुद, चुकीची विक्रीव्यवस्था यामुळे कृषी क्षेत्र संकटात सापडले आहे. कृषी क्षेत्राच्या निगडीत सर्व समस्या अल्पावधीत सोडवता येत नसल्या तरी त्या सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, नवतंत्रज्ञान, पिकांची किंमत आणि बाजारपेठेची नव्याने मांडणी केल्यास भारताचा शाश्वत विकास 2047 पर्यंत शक्य असल्याचे डॉ. गोयारी यांनी स्पष्ट केले.यावेळी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, भारताच्या शाश्वत विकासासाठी कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे. कृत्रीम बुध्दीमत्तेच्या वापरासाठी नियम आणि नियमन करावे लागणार आहे. देशाच्या शाश्वत विकासासाठी कृत्रीम बुध्दीमत्तच्या वापराबरोबर तरुणामध्ये श्रमसंस्कृती रुजवावी लागणार आहे. देशाच्या शाश्वत विकासासाठी नव तंत्रज्ञानाबरोबरच कैशल्य विकासावर भर देवून संशोधन करावे लागणार आहे. भारताच्या विकासामध्ये सुरवातीपासुनच कृषी क्षेत्राचे मोठे योगदान राहीले आहे. आजही सर्वाधिक लोकसंख्या कृषी क्षेत्राशी संबंधीत असल्याने कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास म्हणजे देशाचा शाश्वत विकास हे सुत्र निश्चित करणे आवश्यक आहे. असेही कुलगुरु डॉ. महानवर यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. गौतम कांबळे म्हणाले, भारताच्या शाश्वत विकासाचा रोड मॅप तयार करण्याचे काम विकसित भारत 2047 या सारख्या परिषदामधुन होणार आहे. या परिषदेत भारताच्या शाश्वत विकासाच्या विविध पैलूवर चर्चा आणि शोधनिबंधाचे सादरिकरण होणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.यावेळी पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. निलम यादवा, डॉ. भक्ती महिंद्रकर यांनी विकसित भारत 2047 : सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विकास आणि आव्हाने या विषयावर मांडणी केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रा. राम भोसले यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इम्रान शेख, भैरवनाथ भुसारे, बालाजी सग्गम, बसवकुमार लंगोटे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले.