Saturday, September 13, 2025
Homeबातम्यास्वातंत्र्य चळवळीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान पुस्तकाचे प्रकाशन

स्वातंत्र्य चळवळीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान पुस्तकाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उदघाटन

कोल्हापूर – ‘ शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह- 2025 च्या उद्घाटन समारंभात प्रा. दत्ता भगत लिखित ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . याप्रसंगी गिरीश मोरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते . अध्यक्षस्थानीप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

या प्रसंगी गिरीर मोरे म्हणाले ”भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचे समजून या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवून होणारे राजकीय सत्तांतर म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नव्हे तर या दोन्हीमध्ये समतोल राखून देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी डॉ. आंबेडकरांची भूमिका होती .

डॉ. मोरे पुढे बोलताना म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या संशोधन कार्यातून ब्रिटीश सत्तेकडून होणारी भारतीयांची लूट व शोषण याबाबत केलेली मांडणी, देशाचे कामगार, उर्जा व पाटबंधारे मंत्री म्हणून केलेले कार्य, भारतीय रिजर्व बँकेची स्थापना व वित्त आयोगाच्या निर्मितीमधील त्यांची भूमिका आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून केलेले अपूर्व कार्य इत्यादींबाबी स्वातंत्र्य चळवळीचाच नव्हे भारतीय राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाची ठरणारी आहेत.

यावेळी प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनीही प्रस्तुत पुस्तकाच्या अनुषंगाने महत्वाचे विवेचन केले. डॉ. कांबळे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉ. आंबेडकरांचे योगदान काय? असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर देण्याचे काम प्रा. दत्ता भगत यांच्या या पुस्तकाने केले आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. आंबेडकरांचा लढा हा देशांतर्गत सामाजिक सुधारणा करणे व ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणे असा दुहेरी स्वरूपाचा होता. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणणे हासुद्धा स्वातंत्र्य चळवळीचाच भाग असू शकतो त्याकडे केवळ राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहणे चुकीचे आहे. भारतीय चलन व्यवस्था, बँकिंग व्यवस्था, शेतीसुधारणा इत्यादींबाबत बाबासाहेबांनी केलेले कार्य भारतीय स्वातंत्र्य लढ्याचाच एका भाग आहे.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा व्यापक होता. सर्व मानवी हक्कांची प्रस्थापना झाल्याशिवाय स्वातंत्र्य अस्तिवात येत नाही. डॉ. आंबेडकरांचा लढा हा भारतीयांच्या मानवी हक्कांसह संपूर्ण स्वातंत्र्याचा होता. देशातील अस्पृश्य समाज, सर्व वर्गातील स्त्रियां, शेतकरी, कामगार आणि इतर मागास वर्गीय समाज याच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले हे त्यांचे कार्य देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे व राष्ट्र निर्मितीचे कार्य आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. अविनाश भाले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. किशोर खिलारे यांनी मानले. यावेळी डॉ. चंद्रकांत कुरणे, कुमार कांबळे, युवराज कदम, डॉ. शोभा शेट्ये, डॉ. अनमोल कोठडिया, श्री. टी. एस. कांबळे, प्रा. साठे, रणवीर कांबळे इत्यादी उपस्थित होते.

अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहामध्ये गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शिक्षणविषयक विचार व कार्य’ या विषयावर डॉ. अशोक राणा यांचे व शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचे ‘महात्मा जोतिराव फुले यांचे शिक्षण विषयक विचार व कार्य’ या विषयांवर ऑनलाईन स्वरुपात व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यांचे विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चैनलद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी प्रशांत सुतार दिग्दर्शित ‘रबरबँड’, मोहम्मद बक्षी दिग्दर्शित ‘आर यु व्हॉलीबॉल’, उमेश मालन दिग्दर्शित ‘दळण’ आणि एल. प्रियंका दिग्दर्शित ‘धुंदाळ’ या लघुपटांचे सादरीकरण व विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे व चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत व त्यांचे सादरीकरण विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये होणार आहे. रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी जेष्ठ पत्रकार यांचे श्रीराम पचिंद्रे यांचे ‘राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चैनलद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार व कार्य’ या विषयावर व्याख्यान समारंभ याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments