Saturday, August 2, 2025
Homeबातम्यादेशाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा वापर करा - सहस्त्रबुध्दे

देशाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा वापर करा – सहस्त्रबुध्दे

सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन

सोलापूर – शिक्षण व पदवीचा उपयोग केवळ नोकरीसाठी नव्हे तर देशाच्या उन्नतीसाठी आणि समृद्धतेसाठी व्हायला हवे, असे मत नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले .

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा वर्धापन दिन समारंभ थाटात साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ प्रकाश महानवार होते . यावेळी आमदार श्री गोपीचंद पडळकर, एचएसएनसी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. यावेळी जीवन गौरव पुरस्कार मानपत्राचे वाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

यावेळी डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला आज 21 वर्षे पूर्ण झाले, आता खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या विकासाचा प्रवास सुरू झाला आहे.  गेल्या 21 वर्षातील विद्यापीठाची वाटचाल व प्रगती चांगली असून यापुढे विद्यापीठाने समाजाशी जोडून व समाजाच्या विकासासाठी आणि शेवटच्या घटकासाठी काम केले पाहिजे.

चॅट जीपीटी, एआयच्या धर्तीवर आज व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाला महत्त्व असून त्यानुसार अध्यापकांनी आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. उद्योजक पिढी निर्माण करण्याचे काम विद्यापीठाने केले पाहिजे. विकसित भारतासाठी सर्व नागरिकांना सोबत घेऊन आणि त्यांचा सहभाग घेऊन विकास साधला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आमदार श्री पडळकर म्हणाले की, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले. यासाठी अनेकांनी आंदोलन केले. समाजाच्या मागणीनुसार शासनाने अहिल्यादेवी यांचे नाव विद्यापीठास दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार करून सबंध भारतभर घाट, बारव निर्माण करीत अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्या एक कुशल प्रशासक होत्या. त्यांचे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, वास्तुशास्त्र आणि रसायनशास्त्रात मोठे योगदान आहे. आज अहिल्यादेवींच्या नावे सुरू असलेल्या विद्यापीठाने चांगली प्रगती करत आहे. यापुढेही शेवटच्या घटकापर्यंत या विद्यापीठाने पोहचले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सर्वंकष व लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपल्या या विद्यापीठाने कारभार करीत आहे. गेला 21 वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून स्थलांतर रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज सर्व क्षेत्रात विद्यापीठाची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प विद्यापीठाने हाती घेतले आहे. त्यात कौशल विकासाचे कोर्सेस, पंढरपूर येथील आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र, तृतीयपंथी सेवा सुविधा केंद्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्रांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. बागला म्हणाल्या की, सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळाले, ही खूप मोठी प्रेरणा आहे. लोककल्याणकारी राणी अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य खूप मोठे. विद्यापीठासाठी गुणवत्तापर्ण शिक्षण, चांगल्या सेवा सुविधा या फार महत्त्वाच्या आहेत. विद्यापीठाचे प्रकल्प खूप चांगले असून वाटचाल चांगली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मंगलताई शहा यांनी विद्यापीठाच्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात विद्यापीठ संकेतस्थळावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वेबपेज लिंकचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी मानले.फोटो ओळी: सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना सन्मानपूर्वक प्रदान करताना नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, आमदार श्री गोपीचंद पडळकर, एचएसएनसी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे व अन्य. *

यांचा या पुरस्काराने झाला सन्मान

1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर.2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): डॉ. भाग्येश बळवंत देशमुख, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.4)उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): राजीव उत्तम खपाले, लेखापाल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन: डॉ. शिरीष शामराव बंडगर, वरिष्ठ लिपिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.6)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार: नवनाथ नागनाथ ताटे, चौकीदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.7)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय): राजेंद्र शंकर गिड्डे, वरिष्ठ लिपिक, मारुतीराव हरिराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब8)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): दत्ता निवृत्ती भोसले, ग्रंथालय परिचर, छत्रपती श्री शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर आणि डॉ. रेवप्पा सिद्धाप्पा कोळी, प्रयोगशाळा परिचर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.

प्रारंभी सकाळी आठ वाजता कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments