धाराशिव – मुंबई येथील वर्ल्ड व्हिजन या संस्थेतर्फे उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी दिला जाणारा 2023 या वर्षासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार धाराशिव येथील ‘अंकुर’ दिवाळी अंकास जाहीर झाला आहे .
वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबईतर्फे 2023 या वर्षी निघालेल्या दिवाळी अंकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेत धाराशिव येथील ‘अंकुर’ दिवाळी अंकास मधुरंग दिपोत्सव राज्यस्तरीय पुरस्कार -2024 देण्यात येत असल्याचे परीक्षक डॉ . मधुसूदन घाणेकर आणि वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा .नागेश हुलवळे यांनी कळविले आहे . 25 मे 2024 रोजी मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . आपला दिवाळी अंक संस्कृती संवर्धान, सामाजिक बांधिलकी यादृष्टीने मराठमोळ्या संस्कृतीच्या लोकिकात भर घालणार आहे असे वर्ल्ड व्हिजन संस्थेने म्हटले आहे.
धाराशिव येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळातर्फे दरवर्षी ‘अंकुर’ दिवाळी अंक काढण्यात येतो . अक्षरवेल साहित्य मंडळाने सलग अठरा वर्षे अंकुर दिवाळी अंक काढण्याचा पराक्रम केला आहे . 2023 चा ‘अंकुर’ दिवाळी अंक कवीवर्य ना.धों महानोर विशेषाक म्हणून काढण्याचा निर्णय अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी घेतला होता . हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, धाराशिवच्या अध्यक्षा डॉ . सौ . सुलभा देशमुख, कार्यकारी संपादक श्रीमती कमल नलावडे, संपादक डॉ. रेखा ढगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
अक्षरवेल साहित्य मंडळ धाराशिव येथील महिला चालवितात . ‘अंकुर’ दिवाळी अंकाचे संपादन व नियोजन अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या पदाधिकारीच करतात .अंकुर दिवाळी अंकातील लेखनही केवळ महिलांनीच केलेले आहे
2023 च्या अंकुर दिवाळी अंकात कवीवर्य ना.धो महानोर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि साहित्याचे विविध पैलू दर्शविणारे दर्जेदार लेख समाविष्ट करण्यात आले आहेत अंकुर दिवाळी अंकास यापूर्वीही महाराष्ट्र साहित्य परिषदेचा तसेच इतर पुरस्कार मिळाले आहेत .