Saturday, January 17, 2026
Homeकलारंजनउत्कर्ष महोत्सवात लोककला सादरीकरणातून समाज प्रबोधन

उत्कर्ष महोत्सवात लोककला सादरीकरणातून समाज प्रबोधन

सोलापूर – महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या राज्यस्तरीय ‘उत्कर्ष’ सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी लोककलेच्या सादरीकरणातून समाजप्रबोधनाचा जागर करण्यात आला.

पोवाडा, भारुड, अभंग, संकल्पना नृत्य आणि लोकवाद्यांच्या तालावर विद्यापीठ परिसर अक्षरशः सांस्कृतिक उत्साहाने भारावून गेला.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा पोवाड्यांच्या माध्यमातून सादर करत विद्यार्थ्यांनी इतिहास जिवंत केला.

शाहिरांच्या खणखणीत आवाजात आणि डफाच्या जोशपूर्ण तालावर अफझलखानाचा वध, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि तरुणाईत नवचैतन्य संचारले.या राज्यस्तरीय महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अशा एकूण १६ विद्यापीठांच्या संघांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी पोवाडा, भारुड, भजन, अभंग, भारतीय लोकवाद्य आणि संकल्पना नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.अभंग सादरीकरणावेळी संपूर्ण वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. तर संकल्पना नृत्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भाष्य करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने लावणीच्या तालावर संकल्पना नृत्य सादर करून शाश्वत विकासाचा संदेश दिला. मुंबई विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाचे सादरीकरणही प्रभावी ठरले. कवितांचेही जोरदार सादरीकरण झाले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. पंकज पवार यांनी महोत्सवाचे चोख नियोजन केले आहे. फोटो ओळी सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments