कान्स – जगभरात प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय महिलांनी बाजी जिंकली आहे. पायल कपाडियाच्या चित्रपटास प्रतिष्ठेचा ग्रँड पिक्स पुरस्कार मिळाला तर अनसुया सेनगुप्ता ही या महोत्सवात अभिनयाचा पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. मराठी अभिनेत्री छाया कदम यांनीही हा महोत्सव गाजविला आहे.
पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट’ या चित्रपटास कान्स महोत्सवात मानाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार मिळाला आहे. तीस वर्षांनंतर कान्स चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत भारताच्या चित्रपटाला याद्वारे प्रवेश मिळाला. पायल कपाडिया यांच्या या चित्रपटामुळे प्रथमच एखाद्या भारतीय चित्रपटाला ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या पायल कपाडिया या पहिल्या भारतीय दिग्दर्शक आहेत . वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
पायल कपाडिया यांनी पुणे येथील फिल्म अँण्ड टेलिविजन .इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय. आय . ) येथून चित्रपट विषयक शिक्षण घेतले . त्यावेळी या संस्थेच्या संचालकपदी गजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली होती . ही नियुक्ती नियमबाह्य आणि अयोग्य असल्याचे दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व पायल कपाडिया यांनी केले. त्यावेळी पायल यांची शिष्यवृती बंद करण्यात आली होती व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्याच पायल कपाडिया आता देशाची शान बनली आहे.
एक्स (पूर्वीचे व्टीटर ) या समाज माध्यमाद्वारे आपला आनंद व्यक्त करताना पायल कपाडिया यांनी म्हटले की”तीस वर्षांनंतर आपल्या देशाला हा पुरस्कार मिळाला ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे. तुम्ही क्लेल्या कौतुकाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. तुम्ही केलेले कौतुक मला अजून मेहनत करायला प्रेरित करते”.
पायल कपाडिया यांचा’ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट’ हा चित्रपट केरळमधील दोन नर्सेसची कहानी सांगतो .यातील महत्वाची भूमिका छाया कदम या मराठी अभिनेत्रीने केली आहे. छाया कदम यांनीही हा महोत्सव गाजविला . एक्स (पूर्वीचे व्टीटर ) या समाज माध्यमावर आपले मत मांडताना त्या म्हणाल्या की “आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाट्याला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक – एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या – त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच, एक – एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहचला आहे.”
छाया कदम यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. अशातच प्रदर्शित झालेल्या लापता लेडीज या हिंदी चित्रपटातील त्यांची मंजूमाई ही भूमिका गाजली . एकापेक्षा एक पाश्चात्य पेहराव केलेल्या अभिनेते अभिनेत्रींच्या गर्दीत आपल्या आईची आठवण म्हणून तिची साडी व नथ घालून कान्स महोत्सवात सहभागी झालेल्या छाया कदम यांनी सर्वांची मने जिंकली .
हा कान्स महोत्सव आणखी गोष्टीसाठी महत्वपूर्ण ठरला . या महोत्सवात प्रथमच एखादया भारतीय अभिनेत्रीला अभिनयासाठी प्रथम पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणारी अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता आहे.अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने कान्स महोत्सवात अनसर्टन रिगार्ड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून इतिहास रचला. कान्स महोत्सवात कोणत्याही श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय व्यक्ती ठरली.
अनसूया सेनगुप्ता हिला बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव दिग्दर्शित ‘शेमलेस’ चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले. ‘शेमलेस’ हा चित्रपट एका सेक्स वर्करच्या कथेवर आधारित आहे. एका पोलिसाला भोसकून ती दिल्लीच्या वेश्यालयातून पळून जाते असे याचे कथानक आहे. हा चित्रपट मानवी जीवन जगण्याची आणि लवचिकतेची कथा संवेदनशीलपणे चित्रित करतो.
कान्स चित्रपट महोत्सवाने भारतीय चित्रपटसृष्टीला आणखी एक सुखद धक्का दिला आहे. चिदानंद नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ‘ला सिनेफ पुरस्कार’ मिळाला आहे.
चिदानंद नाईक यांच्या रुपाने पुणे येथील एफ.टी आय.आय. मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.चिदानंद नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ या लघुपटाला 77 व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ‘ला सिनेफ पुरस्कार’ मिळाला. चिदानंद नाईक यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथे त्यांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तीन सहका-यांना सोबत घेऊन हा चित्रपट बनवला.कान्स येथे 2,623 लघुपटातून या चित्रपटाने प्रथम पुरस्कार मिळविला. एकंदर कान्स चित्रपट महोत्सवात पुणे येथील एफ.टी आय.आय. चा डंका ही जोरदार वाजला आहे.