पुणे- एबीपी न्यूज चॅनलने सात ज्योतिषांना कार्यक्रमात आणून देशाचे पंतप्रधान कोण बनतील, कोणत्या नेत्याचे ग्रह कसे आहेत अशा प्रकारचे प्रश्न विचारत ‘राजयोग का राज ‘ हा कार्यक्रम सादर केला. अशा प्रकारचा कार्यक्रम एबीपी न्यूजने प्रसारित करणे हा अंधश्रध्दा जोपासण्याचा , वाढविण्याचा प्रयत्न आहे आहे अशी टीका अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
‘बोलो जुबां केसरी’ ही घोषणा देणा-या विमल कंपनीने हा ‘राजयोग का राज ‘ कार्यक्रम प्रायोजित केला होता. अँकर विवेक श्रीवास्तव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. देशभरातले मान्यवर ज्योतिषी आम्ही निमंत्रित केले असून त्यात शुभेश वर्मन, अश्विनी सहगल, अनिल वत्स, एच.ए.रावत,आचार्य चंद्रशेखर शास्त्री, संजीव शांडिल्य त्यागी, राजकुमार शास्त्री यांचा समावेश असल्याचे विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले.
निवडणुकीच्या संदर्भात विविध संशोधन संस्थांनी घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष आधीच जाहीर करण्यात आले आहेत. अशा संशोधन संस्थांनी एक्झिट पोल घेणे आणि त्याचे निष्कर्ष जाहीर करणे यात कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ज्योतिषांना बोलावून त्यांना निवडणुकीचे आणि नेत्यांचे भविष्य विचारणे हा प्रकार अंधश्रध्दांना खतपाणी घालणारा आहे. इतरही टीव्ही वाहिन्या असे प्रकार करीत असतील तर ते निषेधार्हच आहे.
लोकप्रबोधन करणे ही माध्यमांचे मूळ कार्य आहे. त्यापासून काही माध्यमे किती दूर जात आहेत आणि स्वतःच अंधश्रध्दा पसरविण्याचे कार्य करीत आहेत याचे हे उदाहरण आहे. एबीपी न्यूज सारख्या वाहिनीने केवळ टीआरपी वाढविण्यासाठी असे प्रकार करु नयेत असे आवाहनही अविनाश पाटील यांनी केले.