सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठात व्याख्यान, प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण यासह विविध उपक्रमांचे आयोजन करुन पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग, भूशास्त्र संकुल आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातील सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन संबंधी जागृती व्हावी या अनुषंगाने विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी जगभर 5 जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. 1973 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले, ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हे या दिवसाचे एक व्यासपीठ मानले जात आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात याच अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात मोठ्या संख्येने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. दिनांक 5 जून रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला यावेळी विद्यापीठाची कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर प्र कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ तथा प्रसंचालक वित्त व लेखा विभाग, डॉ केदारनाथ काळवणे संचालक विद्यार्थी कल्याण, डॉ राजेंद्र वडजे संचालक राष्ट्रीय सेवा योजना, आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत जगताप तसेच विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक संचालक महिला कर्मचारी, सुरक्षा विभाग नर्सरी विभागाचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्या सर्वांच्या हस्ते एकूण 50 इतक्या आंबा या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले यासाठी श्री. बोडके नर्सरी यांच्याकडून या 50 झाडांचे प्रायोजिक आणि श्रीमती योगिनी घारे, कुलसचिव यांचे सहकार्य लाभले.
दुपारी बारा वाजता ऑनलाईन माध्यमातून एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता यासाठी प्रा. अरुणदीप अहवालिया माजी संचालक तथा विभाग प्रमुख स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस आणि सेंटर फॉर अप्लाइड जॉलॉजी पंजाब युनिव्हर्सिटी चंदिगड यांचे “Land restoration, desertification and drought resilience”या जागतिक पर्यावरण दिनाच्या असणाऱ्या विषयावरच व्याख्यान आयोजित केले होते यासाठी युट्युब व तसेच गुगल मीट माध्यमातून विद्यार्थ्यांनी तसेच संशोधकांनी संवाद साधला. या व्याख्यानामध्ये डॉ .विनायक धुळप यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व व्याख्यात्याची ओळख करून दिली तर डॉ. फरजाना बिराजदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सर्वांचे आभार मानले.
याच दिवशी दिवसभर जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने पर्यावरणाबद्दल जनजागृती या विषयासंबंधीत ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. त्याची लिंक सर्व सोशल मीडियाद्वारे ई-मेल द्वारे तसेच व्हाट्सअप द्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांसाठी ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
या जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन हे भूशास्त्र संकुलाचे संचालक तथा पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख विनायक धुळप यांनी केले व त्यांना डॉ.धवल कुलकर्णी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.