सोलापूर जिल्हयावर आभाळमाया ; जून महिन्यातच चांगला पाऊस
सोलापूर – मान्सूनने यावर्षी सोलापूर जिल्हयावर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्हयात ठिकठिकाणी गेले चार दिवस पाऊस पडतो आहे. रविवारीही ( 9 जून ) पावसाने दमदार हजेरी लावली . पुढील तीन दिवस पाऊस येत राहील असा अंदाज आहे. सोलापूरचे वरदायिनी उजनी धरण हे वजा 60 टक्के या ऐतिहासिक वजा पातळीपर्यंत पोहोचले होते. या धरणात पाणी येऊ लागल्याने लोक आनंदले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस उशीरा आला तर काय होईल? याची चिंता उजनी धरणावर अवलंबून असणा-या शहरांना, गावांना होती. मात्र यावर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल होताना, प्रथम सोलापूर जिल्हयात आला आहे. उजनी धरणाच्या पाणीपातळीत थोडी का होईना वाढ होत आहे, शेतकरी , नागरिकही पावसामुळे सुखावले आहेत. काही भागात तर पेरणीयोग्य पाऊस पडला आहे.
सोलापूर जिल्हा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात येत असल्याने ,ऑगस्टनंतरच परतीचा पाऊस जिल्हयात पडतो. त्यामुळे पुणे जिल्हयात पडणा-या पावसामुळे उजनी धरण किती भरते? याकडे सर्वांचे लक्ष असते.
गतवर्षी 2023 मध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने उजनी धरण 60 टक्क्यांपर्यंतच भरले. त्यामुळे यावर्षी 21 जानेवारी 2024 रोजीच धरणातील जिवंत पाणीसाठा संपला. आणि मे अखेरीस धरणाने विक्रमी वजा पातळी गाठली.
महाराष्ट्रात मान्सून सरासरी 7 जूनला येतो. मात्र सोलापूर जिल्हयाला दरवर्षी मान्सूनची खूप प्रतीक्षा करावी लागते. जून 2024 ने मात्र सोलापूर जिल्हयाला सुखद धक्का दिला आहे. 6 जून रोजीच सोलापूर जिल्हयात मान्सूनचे आगमन झाले . तेव्हापासून चार दिवस नित्यनियमाने पाऊस सोलापूर जिल्हयात बरसतो आहे. जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली आहे. उजनी धरणातील पाणीसाठा थोड्या प्रमाणात का होईना वाढू लागला आहे. वजा 60 पर्यंत पोहोचलेली पाणी पातळी आता वजा 57 टक्केंच्या आसपास पोहोचली आहे. धरणक्षेत्रात आतापर्यंत 100 मि.मि. पावसाची नोंद झाली. आहे. सोलापूर जिल्हयात जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 102.5 मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी जूनच्या दुस-या आठवड्यातच पाऊस ही सरासरी ओलांडत आहे. पावसामुळै वातावरणात कमालीचा बदल होऊन गारठा आला आहे. तापमान मे अखेरीस 43 अंशापर्यंत पोहोचले होते, ते आता 25 अंशापर्यंत खाली आले आहे. पुणे जिल्हयातही दमदार पाऊस सुरु आहे. पुणे जिल्हयातील धरणे भरल्यावर भीमा नदीतून उजनी धरणात पाणी येते.